बाणेर परिसरामध्ये एका केअरटेकरने आपल्या कुटुंबाच्या मदतीने एका वृद्ध रुग्णाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
केअरटेकरने केली वृद्ध रुग्णाची फसवणूक
पुणे : बाणेर परिसरामध्ये एका केअरटेकरने आपल्या कुटुंबाच्या मदतीने एका वृद्ध रुग्णाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पीडित महिलेच्या बँक खात्यातून तब्बल १ कोटी ९५ लाख ४० हजार रुपये काढून घेत, तसेच सुमारे ८५० ग्रॅम सोन्याचे आणि ५ किलो चांदीचे दागिने लांबवून एकूण २ कोटी रुपयांचा अपहार करण्यात आला आहे.
या प्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाणेर येथील ‘स्काय ऑर्किला सोसायटीतील प्रकार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर येथील ‘स्काय ऑर्किला सोसायटी’ (योगी पार्क) येथे राहणाऱ्या एका ४७ वर्षीय व्यक्तीने या संदर्भात तक्रार दिली आहे.
त्यानुसार माधवी शशिकांत पवार (वय ४९), जोशुआ शशिकांत पवार (वय ३१) आणि भाग्यश्री जोशुआ पवार (वय ३४, सर्व रा. स्काय ऑर्किला सोसायटी, बाणेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
हा प्रकार फेब्रुवारी २०२६ ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत घडला.
धमकी देऊन केली फसवणूक मावशी
तक्रारदार यांच्या ८२ वर्षीय आई निवृत्त बालरोगतज्ज्ञ (पेडियाट्रिशियन) आहेत. त्यांच्या देखभालीसाठी माधवी पवार हिची ‘केअरटेकर’ म्हणून नेमणूक करण्यात आली होती.
मात्र, माधवीने आपल्या कुटुंबीयांच्या साथीने तक्रारदार आणि त्यांच्या वृद्ध आईचा विश्वासघात केला. ‘आईची योग्य देखभाल व उपचार होणार नाहीत’ अशी भीती तिने तक्रारदाराला दाखवली.
तसेच त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून तुरुंगात टाकण्याची आणि जीवे मारण्याची धमकी वेळोवेळी दिली.
या धमक्यांना घाबरवून आरोपींनी तक्रारदाराकडून जबरदस्तीने धनादेशावर (चेक) स्वाक्षऱ्या घेतल्या आणि त्यांच्या आईच्या बँक खात्यातून १ कोटी ९५ लाख ४० हजार रुपये काढण्यास भाग पाडले.
याशिवाय, वृद्ध आईच्या वडिलोपार्जित स्त्रीधनातील ८५० ग्रॅम सोन्याचे आणि ५ किलो चांदीचे दागिने व वस्तू देखभालीच्या बहाण्याने विश्वासाने ताब्यात घेऊन त्यांचाही अपहार केला.
या प्रकरणी १६ सप्टेंबर रोजी बाणेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.









