राजकीय खळबळ : महानगरपालिकेच्या अभ्यासिका आणि ग्रंथालयात तोडफोड केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या दोन माजी नगरसेवकांसह १० ते ११ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यात मोठी राजकीय खळबळ, नगरसेवकांसह ११ जणांवर गुन्हा दाखल!
पुणे: पुण्यातील राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे.
पुणे महानगरपालिकेच्या (PMC) अभ्यासिका आणि ग्रंथालयात अनधिकृत प्रवेश करून तोडफोड केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या दोन माजी नगरसेवकांसह १० ते ११ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
या बड्या नेत्यांवर झाली कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगरसेवक सूरज लोखंडे आणि नगरसेविका प्रिया गदादे-पाटील यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
या दोन्ही बड्या लोकप्रतिनिधींवर गुन्हा दाखल झाल्यामुळे पुण्याच्या राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
पुणे महानगरपालिकेतर्फे चालवल्या जाणाऱ्या एका अभ्यासिका व ग्रंथालयाच्या इमारतीमध्ये हे संपूर्ण नाट्य घडले.
फिर्यादीच्या संमतीशिवाय आरोपींनी या अभ्यासिकेत आणि ग्रंथालयात बेकायदेशीरपणे व अनधिकृतपणे प्रवेश केला.
त्यानंतर आरोपींनी तिथे प्रचंड तोडफोड केली, ज्यामध्ये अभ्यासिकेच्या साहित्याचे आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले.
एवढेच नव्हे तर, राष्ट्रवादीच्या या नेत्यांवर ग्रंथालयातील साहित्याचे नुकसान करून चोरी केल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे.
जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप (ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा)
मिळालेल्या तक्रारीनुसार, अभ्यासिका आणि ग्रंथालयात सुरू असलेल्या या तोडफोडीचा जाब विचारण्यासाठी जेव्हा फिर्यादी तेथे गेले, तेव्हा आरोपींनी त्यांना सर्वांसमक्ष अत्यंत हीन दर्जाची जातीवाचक शिवीगाळ केली आणि त्यांचा जाहीर अपमान केला.
या गंभीर कृत्यामुळे पर्वती पोलिसांनी या दोन्ही नगरसेवकांवर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत (SC/ST Act) गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस तपास सुरू
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने पावले उचलत गुन्हा दाखल केला असून, संशयित आरोपींची चौकशी सुरू केली आहे.
भरदिवसा महानगरपालिकेच्या सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करणे आणि लोकप्रतिनिधींनीच कायदा हातात घेतल्यामुळे प्रशासकीय पातळीवरही तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पर्वती पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत असून पुढील कायदेशीर कारवाई काय होते, याकडे आता संपूर्ण पुणेकरांचे लक्ष लागले आहे.








