सांडपाणी वाहिनीच्या (ड्रेनेज) कामासाठी खोदण्यात आलेल्या तब्बल १५ फूट खोल खड्ड्यात पडून एका ६९ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
१५ फूट खोल खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
पुणे (येरवडा): पुण्यातील येरवडा गाडीतळ भागात एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. सांडपाणी वाहिनीच्या (ड्रेनेज) कामासाठी खोदण्यात आलेल्या तब्बल १५ फूट खोल खड्ड्यात पडून एका ६९ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. प्रदीप लक्ष्मण परदेशी (वय ६९, रा. येरवडा) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे.
या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, प्रशासकीय ढिसाळ कारभार आणि सुरक्षेकडे झालेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच हा बळी गेल्याचा थेट आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
काय आहे नेमकी घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, येरवड्यातील गाडीतळ परिसरात गेल्या काही दिवसांपासून सांडपाणी वाहिनी दुरुस्ती आणि बदलण्याचे काम सुरू आहे.
यासाठी रस्त्याच्या कडेला सुमारे १५ फूट खोल खड्डा खणण्यात आला होता.
दरम्यान, प्रदीप परदेशी हे परिसरातून जात असताना त्यांचा अंदाज चुकल्याने ते या खोल खड्ड्यात थेट कोसळले.
खड्डा खोल असल्याने आणि त्यात सांडपाणी असल्याने ते गंभीर जखमी झाले.
परदेशी खड्ड्यात पडल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत त्यांना बाहेर काढले.
त्यांना अत्यंत गंभीर अवस्थेत जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
सुरक्षा उपायांचा पूर्णपणे अभाव; नागरिकांचा संताप
या घटनेनंतर स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाविरोधात आणि संबंधित कंत्राटदाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करत तीव्र संताप व्यक्त केला.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, इतका मोठा आणि धोकादायक खड्डा खणला असतानाही त्याभोवती कोणतीही भक्कम बॅरिकेडिंग (संरक्षक कठडे) लावण्यात आली नव्हती.
तसेच रात्रीच्या वेळी वाहनचालकांना किंवा पादचाऱ्यांना हा खड्डा दिसावा, यासाठी कोणतीही प्रकाश व्यवस्था किंवा इशारा देणारे फलक लावण्यात आले नव्हते.
“हा निव्वळ अपघात नसून प्रशासनाचा निष्काळजीपणा आणि कंत्राटदाराने लोकांच्या जिवाशी खेळलेला खेळ आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली आहे.
ऐन गर्दीच्या आणि निवासी भागात अशा प्रकारे सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून काम केले जात असल्याने भविष्यातही अशा दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कारवाईची मागणी
या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
मात्र, दोषी कंत्राटदार आणि दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.








