Tukaram Mundhe: रील्समध्ये अडकू नका, यश घाईने मिळत नाही’; IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांचा तरुणाईला मोलाचा सल्ला


रील्स स्क्रोल करण्यात तासन्‌तास घालवणाऱ्या आजच्या तरुणाईची आयएएस (IAS) अधिकारी तुकाराम मुंढे यांनी एका कार्यक्रमात चांगलीच कानउघडणी केली आहे.

IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी केली तरुणाईची कानउघडणी

मुंबई: सोशल मीडियावर रील्स स्क्रोल करण्यात तासन्‌तास घालवणाऱ्या आजच्या तरुणाईची आयएएस (IAS) अधिकारी आणि महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एका कार्यक्रमात चांगलीच कानउघडणी केली आहे.

“आजच्या डिजिटल युगात एका क्लिकवर माहितीचा प्रचंड साठा उपलब्ध असला, तरी स्वतः विचार करण्याची क्षमता, विवेक आणि संयम जपणं अधिक महत्त्वाचं आहे,” असा मोलाचा संदेश त्यांनी तरुणांना दिला.

स्क्रीन टाइम वाढल्याने एकाग्रतेवर परिणाम

डिजिटल माध्यमांच्या वाढत्या वापरामुळे तरुणांचा स्क्रीन टाइम प्रचंड वाढत असून, त्याचा थेट परिणाम त्यांच्या एकाग्रतेवर होत असल्याचं तुकाराम मुंढे यांनी अधोरेखित केलं. आजच्या तरुणांचे लक्ष काही सेकंदांतच दुसरीकडे वळते.

यावर बोट ठेवत ते म्हणाले, “प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सात सेकंदांच्या रील्समध्ये मिळत नाही. यश कधीही घाईने मिळत नसते, त्यासाठी सातत्य, मेहनत आणि चिकाटी अत्यंत महत्त्वाची असते.”

सोशल मीडियावर सतत रील्स पाहण्याऐवजी तरुणांनी थोडं थांबून विचार करण्याची सवय लावली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

सोशल मीडियाच्या अल्गोरिदमचे गुलाम बनू नका

तुकाराम मुंढे यांनी तरुणांना सोशल मीडियाच्या अल्गोरिदमवर आणि त्याच्या चक्रव्यूहात अडकून न पडण्याचा कडक सल्ला दिला.

“आम्हाला तेच बघायचंय, तेच ऐकायचंय आणि तेच करायचंय जे आम्हाला आवडतं, या मानसिकतेतून तरुणांनी बाहेर पडायला हवे.

आपल्याला आवडणाऱ्या गोष्टीच वारंवार पाहिल्याने विचारांची व्याप्ती मर्यादित होते. त्यामुळे स्वतःच्या आवडीनिवडींच्या पलीकडे जाऊन वेगवेगळे विषय समजून घेणं आवश्यक आहे,” असे मुंढे यांनी स्पष्ट केले.

माहिती म्हणजे ज्ञान नव्हे!

एखादी गोष्ट सोशल मीडियावर वारंवार दिसते म्हणून ती खरी मानणं किंवा इतर लोक जे करतात तेच डोळे झाकून स्वीकारणं चुकीचं आहे.

केवळ माहिती मिळवणं म्हणजे ज्ञान मिळवणं नव्हे, तर त्या माहितीचा योग्य वापर करण्यासाठी विवेक आवश्यक आहे. प्रत्येक माहितीची चिकित्सा करणं, प्रश्न विचारणं आणि स्वतःचा निर्णय स्वतः घेणं गरजेचं आहे.

इतरांचं आंधळेपणाने अनुकरण करण्याऐवजी तरुणांनी स्वतःचे ध्येय निश्चित करून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करावी, असा मोलाचा संदेश त्यांनी शेवटी दिला.

तुकाराम मुंढे यांच्या या परखड आणि मार्गदर्शक विचारमंथनाची सध्या सोशल मीडिया आणि तरुणाईमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.

 


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!