बारामती तालुक्यातील काऱ्हाटी गावामध्ये एका तरुणावर कोयत्याने जोरदार हल्ला करण्यात आला या हल्ल्यात तरुण जखमी झाला असून त्याच्यावर पुण्यात उपचार सुरू आहे.
भर दिवसा हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये घबराट
बारामती: तालुक्यातील काऱ्हाटी गावच्या मुख्य चौकात भरदिवसा एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
अमोल सदाशिव जाधव असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून, त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी ऋतिक आणि ओंकार या दोन संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे.
पूर्ववैमनस्यातून हल्ला
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा हल्ला जुन्या वादातून झाला आहे.
संशयित आरोपी ऋतिक आणि ओंकार यांनी अमोल जाधव यांना काऱ्हाटीच्या मुख्य चौकात गाठले आणि त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले.
या भीषण हल्ल्यात अमोल यांच्या डोक्यावर, हातावर आणि शरीराच्या इतर भागांवर गंभीर जखमा झाल्या आहेत. घटनेनंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
परिसरात खळबळ, कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
भरचौकात झालेल्या या प्रकारामुळे काऱ्हाटी परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेत तपास सुरू केला आहे.
आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके बारामती तालुक्यातील विविध भागात रवाना करण्यात आली आहेत.
हा वाद नेमका कशामुळे झाला आणि यात इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.
दरम्यान, बारामती शहर आणि तालुक्यात गेल्या काही दिवसांत ‘कोयता गँग’ आणि गुंडगिरीचे प्रमाण वाढले आहे. काऱ्हाटी येथील या ताज्या घटनेमुळे तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.









