Pune Accident News : पुणे-सोलापूर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदार गणेश दाभाडे यांचा मृत्यू; चालक फरार


पुणे-सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन येथे एका भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत पोलीस सहाय्यक फौजदार गणेश दाभाडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

फौजदार गणेश दाभाडे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू

पुणे: पुणे-सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन येथे एका भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत पोलीस सहाय्यक फौजदार गणेश दाभाडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की, दाभाडे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर चालक वाहन घेऊन घटनास्थळावरून फरार झाला असून, या घटनेमुळे उरुळी कांचन आणि पोलीस दलात तीव्र शोककळा पसरली आहे.

शासकीय काम आटोपून परतताना अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, सहाय्यक फौजदार गणेश दाभाडे हे पोलीस ठाण्यातील शासकीय काम आटोपून बाहेर पडले होते.

मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास ते पुणे-सोलापूर महामार्ग पायी ओलांडत असताना, सोलापूरच्या दिशेने भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली.

ही धडक एवढी भीषण होती की, दाभाडे रस्त्यावर फेकले गेले. गंभीर दुखापत आणि मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.

अपघात होताच चालकाने वाहनाचा वेग वाढवून अंधाराचा फायदा घेत तिथून पोबारा केला.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध सुरू

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दाभाडे यांचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले. पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

त्या म्हणाल्या, “एक कर्तव्यदक्ष सहकारी अशा अपघातात गमावणे अत्यंत वेदनादायी आहे.

महामार्गावरील टोलनाके आणि लगतच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून, फरार चालकाला लवकरच अटक केली जाईल.”

मूळचे धुळे जिल्ह्यातील रहिवासी

अपघातात मृत्युमुखी पडलेले गणेश दाभाडे हे मूळचे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा (सिंदखेडा) तालुक्याचे रहिवासी होते.

सन २००१ मध्ये ते महाराष्ट्र पोलीस दलात भरती झाले होते. पुणे ग्रामीण पोलीस दलातील विविध ठाण्यांमध्ये त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता.

शांत, संयमी आणि मनमिळावू स्वभावामुळे ते पोलीस दल आणि नागरिकांमध्ये अत्यंत लोकप्रिय होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुले आणि मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या गावी आणि पोलीस वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.

महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

उरुळी कांचन हद्दीतील पुणे-सोलापूर महामार्गावर अपघातांची मालिका दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

महामार्गावर रात्रीच्या वेळी अनेक ठिकाणी पथदिवे बंद असल्याने गडद अंधार असतो. तसेच पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग किंवा पादचारी पुलांची (FOB) सोय नाही.

वाहनांच्या वेगावर मर्यादा आणण्यासाठी कोणतीही यंत्रणा किंवा स्पीड गनचा वापर केला जात नसल्याने पादचाऱ्यांचा जीव धोक्यात आला असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!