Pune News: कोंढवा बुद्रुकमधील स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; वेश्याव्यवसायातून 2 महिलांची सुटका, 1 महिला आरोपी अटकेत


साळवे गार्डन शेजारील ‘अल्टिमेट बिझनेस सेंटर’ या इमारतीत स्पा आणि मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या या वेश्याव्यवसायाचा काळ्या धंद्यावर पोलिसांनी अचानक छापा टाकला.

मोठ्या बेकायदेशीर वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

पुणे: पुणे शहरातील बेकायदेशीर व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्याच्या मोहिमेअंतर्गत कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने एका मोठ्या बेकायदेशीर वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला आहे.

साळवे गार्डन शेजारील ‘अल्टिमेट बिझनेस सेंटर’ या इमारतीत स्पा आणि मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या या काळ्या धंद्यावर पोलिसांनी अचानक छापा टाकला.

या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, एका महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरात सुरू असलेल्या बेकायदेशीर व्यवसायांवर कडक कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले होते.

या आदेशानुसार कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) दीपक कराडे यांच्या मार्गदर्शनाखाली बेकायदेशीर व्यवसायांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली होती.

बनावट ग्राहक पाठवून खात्री आणि छापा

पोलीस उपनिरीक्षक आकाश विटे यांचे पथक हद्दीत गस्त घालत असताना, पोलीस अंमलदार गणेश चिंचकर आणि विजय खेंगरे यांना गुप्त बातमीदाराकडून एक महत्त्वाची माहिती मिळाली.

साळवे गार्डनजवळील ‘अल्टिमेट बिझनेस सेंटर’ इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर स्पा मसाजच्या नावाखाली मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याचे समजले.

माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले.

पोलिसांनी आधी एका बनावट ग्राहकाच्या माध्यमातून या बातमीची खात्री केली आणि त्यानंतर अचानक दुकानावर छापा टाकला.

गुन्हा दाखल आणि पुढील तपास

या छाप्यात पोलिसांनी वेश्यागमनासाठी ठेवलेल्या २ पीडित महिलांची सुटका केली.

याप्रकरणी मुख्य महिला आरोपीला अटक करण्यात आली असून, तिच्याविरुद्ध दि. कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) दीपक कराडे करत आहेत.

कारवाई करणारे पोलीस पथक

सदरची धडक कारवाई पुणे शहराच्या पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ ०५) श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, वानवडी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील आणि पोलीस निरीक्षक दीपक कराडे यांनी केली.

या मोहिमेत तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक आकाश विटे, तसेच पोलीस अंमलदार महेश बेदुगडे, अभिजित जाधव, अभिजित रत्नपारखी, गणेश चिंचकर, अमित बधे, उमेश पाटील, सुषमा हिंगमिरे, विजय खेंगरे, अनिल बनकर, रुपेश पाटील, प्रवीण उत्तेकर, अरुण किटे, सुजित मदन, मैरु थोरात, सोनाली कांबळे आणि स्नेहा काचरेकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!