CJP News | कॉक्रोच जनता पार्टीत फूट? अभिजीत दीपके म्हणाले, “आम्ही विद्यार्थ्यांची टीम ‘ए’ आहोत”


अहमदाबादमधील मनीष ब्रह्मभट्ट यांनी ही घोषणा केली असून, त्यांनी सीजेपी चे संस्थापक अभिजीत दीपके यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

अभिजीत दीपके यांच्यावर गंभीर आरोप

कॉक्रोच जनता पार्टी अर्थात सीजेपीमध्ये फूट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.

सीजेपीचा एक गट वेगळा झाला असून, या गटाने कॉक्रोच जनता पार्टी डेमोक्रेटिक (सीजेडी डेमोक्रेटिक) नावाने स्वतंत्र संघटनेची घोषणा केली आहे.

अहमदाबादमधील मनीष ब्रह्मभट्ट यांनी ही घोषणा केली असून, त्यांनी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांवर आता अभिजीत दीपके यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

मनीष ब्रह्मभट्ट यांनी अभिजीत दीपके हे आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप केला आहे.

तसेच सीजेपीने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून सुरू केलेल्या आंदोलनाला राजकीय वळण दिल्याचा दावाही त्यांनी केला.

सर्वांनी ठरवावे आम्ही कोणाचे कोण आहोत

या आरोपांना उत्तर देताना अभिजीत दीपके म्हणाले, “कधी महाराष्ट्राचे सीए म्हणतात की मी काँग्रेसची बी टीम आहे, तर काही लोक म्हणतात की मी आम आदमी पक्षाची बी टीम आहे. मला वाटते की या सर्व लोकांनी एकत्र बसावे आणि ठरवावे की आम्ही कोणाचे कोण आहोत. आम्ही विद्यार्थ्यांची टीम ‘ए’ आहोत.”

मनीष ब्रह्मभट्ट यांचे नेमके आरोप काय?

मनीष ब्रह्मभट्ट यांनी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना सीजेडी डेमोक्रेटिकची स्थापना केल्याची माहिती दिली.

सीजेपीचे आंदोलन यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली; मात्र नंतर निवडक लोकांची टीम तयार करून तिला राजकीय स्वरूप देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

अभिजीत दीपके हे अरविंद केजरीवाल यांच्या इशाऱ्यावर काम करत असून, राजकीय डील करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही ब्रह्मभट्ट यांनी केला.

त्यांच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लढण्याऐवजी भाजपविरोधी राजकीय पक्षांना समर्थन दिले जात आहे.

या टीममध्ये आम आदमी पक्षाशी संबंधित आठ जण असल्याचा दावाही त्यांनी केला.

शिवसेना, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलानेही समर्थन दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.

वारंवार सांगूनही अपेक्षित बदल नाहीच

“आमच्या टीममध्ये कोणताही विद्यार्थी नाही,” असा आरोप करत ब्रह्मभट्ट यांनी मेरिटच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा मुद्दाही उपस्थित केला.

दिल्लीतील नीट पेपर लीक प्रकरणानंतर जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनात आपण सहभागी झालो होतो, असेही त्यांनी सांगितले.

वारंवार सांगूनही अपेक्षित बदल झाला नाही, त्यामुळे स्वतंत्र टीम स्थापन केल्याचा दावा त्यांनी केला आहे.


4
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!