गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल! पुणे रेल्वेचा 15 दिवसांचा ब्लॉक; 42 ट्रेन्स रद्द, 25 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
गणेशोत्सवात १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरदरम्यान रेल्वे ब्लॉक
पुणे : ऐन गणेशोत्सवाच्या काळात पुणे रेल्वे विभागातील प्रवाशांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
हडपसर ते घोरपडी कोच मेंटनन्स कॉम्प्लेक्स (जीसीएमसी) दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गिकेच्या कामासाठी पुणे आणि हडपसर यार्डमध्ये प्री-नॉन इंटरलॉकिंग आणि नॉन इंटरलॉकिंगचे काम हाती घेण्यात येणार आहे.
या कामासाठी १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरदरम्यान टप्प्याटप्प्याने वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे.
त्यामुळे पुणे विभागातून धावणाऱ्या मेल-एक्स्प्रेस, डेमू आणि लोकल गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे.
अप आणि डाउन मुख्य मार्गावर ब्लॉक
रेल्वेच्या नियोजनानुसार, १९ ते २३ सप्टेंबरदरम्यान दररोज दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पुणे-हडपसर मार्गावरील अप आणि डाउन मुख्य मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल.
त्यानंतर २४ सप्टेंबरपासून ब्लॉकचा कालावधी टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येणार आहे.
३ ऑक्टोबरला हडपसर यार्डमध्ये सकाळी ८ ते दुपारी १२ आणि दुपारी १२ ते सायंकाळी ४ या दोन टप्प्यांत वाहतूक ब्लॉक असेल.
तर ४ ऑक्टोबर हा मुख्य कामाचा दिवस असून, हडपसर-जीसीएमसी विभागात मध्यरात्रीपासून सकाळी १०.३० वाजेपर्यंत वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे.
त्यानंतर सकाळी १०.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत सिग्नल आणि दूरसंचार यंत्रणेशी संबंधित कामे केली जाणार आहेत.
या ब्लॉकमुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे.
एकूण ४२ मेल-एक्स्प्रेस आणि प्रवासी गाड्या रद्द
एकूण ४२ मेल-एक्स्प्रेस आणि प्रवासी गाड्या रद्द करण्यात येणार असून, त्यांच्या ९८ फेऱ्या प्रभावित होतील. याशिवाय २५ गाड्यांचे मार्ग बदलण्यात येणार असून, त्यांच्या ३६ फेऱ्यांवर परिणाम होणार आहे.
तसेच ३५ गाड्या नियोजित स्थानकाऐवजी अन्य स्थानकांवर अल्प समाप्त किंवा अल्प प्रारंभ करण्यात येणार आहेत.
त्यामुळे या गाड्यांच्या ९९ फेऱ्या प्रभावित होतील. याशिवाय २२ गाड्यांच्या ७१ फेऱ्यांचे नियमन, तर १४ गाड्यांच्या २५ फेऱ्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे.
या ब्लॉकचा परिणाम पुणे-सोलापूर, पुणे-नागपूर, पुणे-मुंबई, पुणे-हावडा यांसह विविध मार्गांवरील एक्स्प्रेस आणि प्रवासी गाड्यांवर होणार आहे.
प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागू शकते
विशेष म्हणजे, ब्लॉकचा काही कालावधी गणेशोत्सवाच्या काळात येत असल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागू शकते.
त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी संबंधित गाडीचे वेळापत्रक, रद्दीकरण, मार्ग बदल आणि अल्प समाप्ती-अल्प प्रारंभाची माहिती तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, तिसऱ्या रेल्वे मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यानंतर पुणे विभागातील रेल्वे वाहतुकीची क्षमता वाढण्यास मदत होणार असून, भविष्यात गाड्यांची संख्या वाढविणे आणि वाहतूक अधिक सुरळीत करणे शक्य होणार आहे.








