Sharad Pawar Pune News : विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्याचा शरद पवार यांच्या कडून निषेध; म्हणाले, ‘हा मूलभूत अधिकारांवर हल्ला’


राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही विद्यानंद बापट यांच्या भूमिकेला पाठिंबा देत हल्ल्याचा निषेध केला आहे.

शरद पवार यांचा विद्यानंद बापट यांच्या भूमिकेला पाठिंबा

पुण्यातील गणेशोत्सवात होणाऱ्या मोठ्या आवाजातील डीजे आणि वाढत्या ध्वनीप्रदूषणाविरोधात भूमिका घेणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर टिळक रस्त्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे.

या घटनेनंतर पुण्यात संतापाची लाट उसळली असून, राजकीय नेत्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांकडूनही हल्ल्याचा निषेध केला जात आहे.

पुणे गुन्हे शाखेने या प्रकरणात तातडीने कारवाई करत हल्ल्याच्या घटनेनंतर अवघ्या तीन तासांत संतोष चव्हाण याला अटक केली.

उत्सवातील ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावर भूमिका मांडल्यामुळेच बापट यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पुण्यातील विविध राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही विद्यानंद बापट यांच्या भूमिकेला पाठिंबा देत हल्ल्याचा निषेध केला आहे.

मोठा गोंगाट सणाचे मूळ गांभीर्यच संपवून टाकतो

शरद पवार म्हणाले की, “कोणी मत व्यक्त केलं म्हणून त्यांच्यावर हल्ला होणं, हा माझ्या मते लोकशाही आणि मूलभूत अधिकारांवर हल्ला आहे.”

गणेशोत्सव आणि इतर सण-उत्सव हे लोकांच्या आनंदासाठी आणि समाधानासाठी असतात.

मात्र, रस्त्यावर डीजे वाजवून होणारा मोठा गोंगाट सणाचे मूळ गांभीर्यच संपवून टाकतो, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.

“विद्यानंद बापट यांना मी ओळखत नाही. पण ते जे बोलत आहेत, त्याला अर्थ आहे. अनेकांनी या कृत्याचा निषेध केला आहे. त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. हे थांबायला पाहिजे,” असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

शहरातील शांतता आणि कायदा-सुव्यवस्था टिकवण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त तसेच राज्य सरकारने या विषयाकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं.

हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक

दरम्यान, हल्ल्यानंतर विद्यानंद बापट यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली.

आपल्याला प्रसिद्धीची हाव नसून, मूळ मुद्द्यांना उत्तर देता येत नसल्यामुळे विरोधकांकडून सवंग प्रसिद्धीचा खेळ सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

“हा लढा बापट विरुद्ध पुणेकर असा अजिबात नाही. उत्सवाच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणी धुडगूस घालणारी मंडळी खरी समाजकंटक आहेत,” अशी टीका बापट यांनी केली.

मारहाण करून आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला असला, तरी ध्वनीप्रदूषणाविरोधातील आपला लढा थांबणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

या प्रकरणामुळे पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, प्रशासन या विषयावर पुढे काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!