कोथरूड परिसरातील विकासकामांवरून मंत्री आणि लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारणारे युट्युबर संतोष पंडित हे कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत.
संतोष पंडित आता कायद्याच्या कचाट्यात सापडले
पुणे | पुण्यातील कोथरूड परिसरातील विकासकामांवरून मंत्री आणि लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारणारे प्रसिद्ध युट्युबर संतोष पंडित हे आता कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत.
सोशल मीडियावरून आक्षेपार्ह आणि अश्लील शेरेबाजी केल्याचा तसेच मंत्री चंद्रकांत पाटील आणि मिताली साळवेकर यांच्याबाबत बदनामीकारक व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी संतोष पंडित यांना अटक केली आहे.
मध्यरात्री गुन्हा दाखल करून केली अटक
पोलिसांनी ३ सप्टेंबर रोजी पहाटे १ वाजून २८ मिनिटांनी संतोष पंडित यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
त्यानंतर पोलिसांचे पथक त्यांच्या राहत्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांना अटक करण्यात आली.
मध्यरात्री झालेल्या या कारवाईमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंडित यांनी त्यांच्या युट्युब अकाउंटवरून मंत्री चंद्रकांत पाटील आणि मिताली साळवेकर यांच्याबाबत आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप आहे.
या व्हिडिओच्या माध्यमातून बदनामीकारक आणि अश्लील शेरेबाजी करण्यात आल्याचा दावा तक्रारदारांकडून करण्यात आला आहे.
हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यानंतर सारिका कांबळे यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
आमदार आणि स्थानिक प्रशासनाच्या कामकाजावर ते भाष्य करत
तक्रारीनंतर पोलिसांनी पंडित यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेतील कलम 75(1)(iv), 75(3), 356(2) आणि 352 तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम 67 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अनिल माने यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
दरम्यान, पंडित हे कोथरूडमधील विकासकामांवरून सातत्याने प्रश्न उपस्थित करत होते.
त्यांच्या युट्युब व्हिडिओंमधून मंत्री, आमदार आणि स्थानिक प्रशासनाच्या कामकाजावर ते भाष्य करत असत.
अगदी २ सप्टेंबर रोजीही त्यांनी कारच्या नंबर प्लेटच्या मुद्द्यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना जाब विचारणारा व्हिडिओ प्रसारित केला होता.
आता मात्र आक्षेपार्ह आणि बदनामीकारक व्हिडिओ प्रसारित केल्याच्या आरोपामुळे संतोष पंडित यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे.
या प्रकरणात नेमका कोणता व्हिडिओ प्रसारित करण्यात आला, त्यातील मजकूर आणि शेरेबाजीचे स्वरूप काय होते, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास कोथरूड पोलीस करत आहेत.








