पुणे महापालिकेच्या (PMC) आरोग्य विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, या वर्षात आतापर्यंत शहरात २,००९ हून अधिक संशयित डेंग्यू रुग्णांची नोंद झाली आहे.
पुणे शहरात २,००९ हून अधिक संशयित डेंग्यू रुग्णांची
पुणे: शहरात गेल्या काही महिन्यांपासून डेंग्यू सदृश्य आजाराच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली असून परिस्थिती चिंताजनक बनली आहे.
पुणे महापालिकेच्या (PMC) आरोग्य विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, या वर्षात आतापर्यंत शहरात २,००९ हून अधिक संशयित डेंग्यू रुग्णांची नोंद झाली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, या एकूण रुग्णसंख्येपैकी तब्बल ६६ टक्के रुग्ण हे एकट्या ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यांत आढळले आहेत.
‘हे’ भाग ठरले डेंग्यूचे हॉटस्पॉट
महापालिकेच्या वॉर्डनिहाय आकडेवारीनुसार, शहरातील काही भागात डेंग्यूचा विळखा अधिक घट्ट झाला आहे.
कोथरूड, नगर रस्ता-वडगावशेरी, आणि औंध-बाणेर हे परिसर सध्या डेंग्यूचे मुख्य ‘हॉटस्पॉट’ बनले असून, या प्रत्येक वॉर्डात २०० हून अधिक रुग्ण आढळले आहेत.
जूननंतर पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे समोर आले आहे.
लोहगावमध्ये चिमुरडीचा संशयास्पद मृत्यू
डेंग्यूच्या वाढत्या संसर्गादरम्यान, लोहगाव येथील केसे पार्क परिसरात राहणाऱ्या एका ९ वर्षीय चिमुरडीचा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
प्राथमिक तपासणीत तिला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले होते.
महापालिकेच्या आरोग्य समितीकडून या मृत्यूच्या कारणाचे अधिकृत ऑडिट केले जात असून, या घटनेमुळे पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
महापालिकेची दंडात्मक कारवाई आणि उपाययोजना
प्रशासनाने डासोत्पत्ती रोखण्यासाठी तपासणी मोहीम तीव्र केली आहे.
शहरात एकूण २,६५१ ठिकाणी डासांची पैदास केंद्र आढळली असून, निष्काळजीपणा करणाऱ्या सोसायट्या, कार्यालये आणि बांधकाम व्यावसायिकांकडून ५.७ लाख रुपयांचा प्रशासकीय दंड वसूल करण्यात आला आहे. जागोजागी फॉगिंग आणि ‘अबेट’ या अळीनाशक औषधांची फवारणी केली जात आहे.
नागरिकांना खबरदारीचे आवाहन
डॉक्टरांच्या मते, तीव्र ताप, डोकेदुखी, सांधेदुखी आणि अंगावर पुरळ उठणे ही डेंग्यूची प्रमुख लक्षणे आहेत. अशी लक्षणे दिसल्यास घरगुती उपचार न करता तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा.
आठवड्यातून एकदा ‘ड्राय डे’ पाळून घरातील पाण्याचे साठे कोरडे करावेत, पाण्याच्या टाक्या झाकून ठेवाव्यात आणि डासांपासून संरक्षणासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.








