शहरातील मोकळ्या भूखंडांना जाळी लावणे बंधनकारक केले जाणार असून, इमारतींच्या गॅलरीमध्ये (बाल्कनी) कपडे वाळत घालण्यावर बंदी घालण्याचा विचार सुरू आहे.
गॅलरीमध्ये (बाल्कनी) कपडे वाळत घालण्यावर बंदीचा विचार
पुणे: पुणे शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी आणि स्वच्छतेचा दर्जा सुधारण्यासाठी पुणे महानगरपालिकेने (PMC) काही कडक आणि नवे नियम लागू करण्याची तयारी दर्शवली आहे.
महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीने आयोजित ‘स्वच्छ संवाद’ कार्यक्रमात महापालिका आयुक्तांनी या संदर्भातील महत्त्वाचे संकेत दिले आहेत.
या नव्या धोरणांतर्गत शहरातील मोकळ्या भूखंडांना हिरवे कापड किंवा जाळी लावणे बंधनकारक केले जाणार असून, इमारतींच्या गॅलरीमध्ये (बाल्कनी) उघड्यावर कपडे वाळत घालण्यावर बंदी घालण्याचा विचार सुरू आहे.
या प्रस्तावित नियमांमुळे सध्या पुणेकर नागरिकांमध्ये जोरदार चर्चा आणि तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
मोकळ्या जागांवर कचरा टाकणाऱ्यांना चाप
शहरातील अनेक भागांमध्ये रिकामे किंवा मोकळे भूखंड आहेत.
या जागांवर नागरिक, हॉटेल व्यावसायिक किंवा बांधकाम व्यावसायिक रात्रीच्या वेळी सर्रासपणे कचरा आणि बांधकामाचा राडारोडा (डेब्रिज) टाकतात.
यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचून अस्वच्छता पसरते.
या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेने आता जागामालकांना त्यांचे भूखंड हिरव्या रंगाच्या जाळीने किंवा कापडाने कुंपणबंद करण्याचे आदेश देण्याची तयारी केली आहे.
यामुळे सुरक्षितता वाढेल आणि उघड्यावर कचरा टाकण्याच्या प्रवृत्तीला आळा बसेल.
शहराच्या सौंदर्यासाठी गॅलरीतील कपड्यांवर नजर
दुसऱ्या बाजूला, मुख्य रस्त्यांच्या कडेला असलेल्या इमारतींमधील फ्लॅट्सच्या गॅलरीत कपडे वाळत घातले जातात, ज्यामुळे शहराचे दृश्य स्वरूप बिघडते, अशी प्रशासनाची भूमिका आहे.
त्यामुळे रस्त्यालगतच्या बाल्कनींमध्ये उघड्यावर कपडे वाळत घालण्यास मनाई करण्याचा धोरणात्मक विचार महापालिका करत आहे.
हे धोरण पुढील ७ दिवसांत अंतिम केले जाण्याची शक्यता आहे.
नागरिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया
महापालिकेच्या या भूमिकेमुळे पुणेकरांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
मोकळ्या जागांना कुंपण घालण्याच्या निर्णयाचे स्वागत होत असले, तरी फ्लॅट संस्कृतीमध्ये कपडे कुठे वाळत घालायचे, असा व्यावहारिक प्रश्न नागरिक विचारत आहेत.
शहर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून पुणेकरांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन महा प्रशासनाने केले आहे.
या नियमांच्या अधिकृत अंमलबजावणीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.








