पुण्यातून फ्रान्समध्ये गेलेल्या एका २९ वर्षीय भारतीय तरुणाला तिथल्या स्थानिक न्यायालयाने बाल लैंगिक शोषण प्रकरणात २० वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
लैंगिक शोषण प्रकरणात २० वर्षांची शिक्षा
पुणे/पॅरिस: उच्च शिक्षणासाठी पुण्यातून फ्रान्समध्ये गेलेल्या एका २९ वर्षीय भारतीय तरुणाला तिथल्या स्थानिक न्यायालयाने बाल लैंगिक शोषण प्रकरणात २० वर्षांची कठोर कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
रोहन राणे असे या मुख्य आरोपीचे नाव असून, तो आंतरराष्ट्रीय पातळीवर बालकांचे लैंगिक शोषण आणि छळ करणाऱ्या एका मोठ्या ऑनलाईन टोळीचा म्होरक्या असल्याचे तपासात सिद्ध झाले आहे.
फ्रान्समधील कायद्यानुसार त्याला या गंभीर गुन्ह्यासाठी कमाल शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
‘डिस्कॉर्ड’वरून चालवायचा रॅकेट
मिळालेल्या माहितीनुसार, रोहन राणे हा फ्रान्समध्ये उच्च शिक्षण घेत होता.
यादरम्यान त्याने ‘डिस्कॉर्ड’ (Discord) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून जगभरातील अल्पवयीन मुलांना आपल्या जाळ्यात ओढले.
त्याने ‘सीव्हीएलटी’ (CVLT) नावाचा एक गुन्हेगारी On-line गट तयार केला होता. या गटाच्या माध्यमातून तो अल्पवयीन मुलांवर मानसिक दबाव टाकायचा.
ही टोळी मुलांना विविध टास्क देऊन त्यांच्याकडून हिंसक आणि लैंगिक स्वरूपाचे व्हिडिओ तयार करून घेत असे.
अमेरिकन गुप्तचर यंत्रणेमुळे पर्दाफाश
या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा सुगावा सर्वात आधी अमेरिकन गुप्तचर यंत्रणेला लागला होता.
अमेरिकन अधिकाऱ्यांनी ही अत्यंत गोपनीय माहिती फ्रान्स पोलिसांना दिली. या इनपुटच्या आधारे फ्रान्स पोलिसांनी २०२१ मध्ये ‘आंतिब’ शहरातून रोहन राणेला अटक केली होती.
तपासादरम्यान या आंतरराष्ट्रीय रॅकेटमध्ये भारत, अमेरिका, जर्मनी आणि न्यूझीलंडमधील इतर काही तरुणांचाही सहभाग असल्याचे समोर आले.
या टोळीतील इतर सदस्यांना अमेरिकेत अटक करण्यात आली आहे.
पीडित मुलांनी दाखवले धाडस
या गुन्ह्यात जागतिक स्तरावर २० हून अधिक पीडित मुलांची ओळख पटवण्यात आली आहे.
यापैकी ६ पीडित मुले आता सज्ञान (प्रौढ) झाली असून, त्यांनी न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहून आरोपीविरुद्ध साक्ष देण्याचे मोठे धाडस दाखवले.
न्यायालयात डिजिटल पुराव्यांच्या आधारे रोहनवरील सर्व आरोप सिद्ध झाले.
सरकारी वकिलांनी रोहन राणेला ३० वर्षांची शिक्षा देण्याची मागणी केली होती.
मात्र, दीर्घ सुनावणीनंतर न्यायालयाने बालकांचे लैंगिक शोषण, छळ आणि सायबर गुन्हेगारी प्रकरणात त्याला २० वर्षांची कमाल शिक्षा सुनावली.
या धक्कादायक प्रकारामुळे भारतीय सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत.









