Pune News : ‘जो गणेशोत्सवावर बोलेल त्याला मारणारच’; बापटांवर हल्ला करणाऱ्या संतोष चव्हाणचा मस्तवालपणा


पुण्यात गणेशोत्सवात डीजेवर बंदी घालावी, अशी मागणी करणारे पुणेकर विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे.

गणेशोत्सवात डीजे च्या विरोधात विद्यानंद बापट यांनी आवाज उठवला

पुण्यात गणेशोत्सवात डीजेवर बंदी घालावी, अशी मागणी करणारे पुणेकर विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे.

टिळक रस्त्यावर झालेल्या या हल्ल्याप्रकरणी संतोष चव्हाण याला पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, हल्ल्यानंतर संतोष चव्हाण याचा मस्तवालपणा दाखवणारा आणखी एक व्हिडीओ समोर आला असून, त्यामध्ये तो बापट यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करताना दिसत आहे.

पुण्यातील गणेशोत्सवात डीजेच्या आवाजावर निर्बंध असावेत, यासाठी विद्यानंद बापट यांनी आवाज उठवला होता.

गणेशोत्सवातील डीजेच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी

काही दिवसांपूर्वी पुणे महानगरपालिकेत गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते आणि पुणेकरांची बैठक झाली होती.

या बैठकीत बापट यांनी गणेशोत्सवातील डीजेच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी केली होती.

त्यांच्या या भूमिकेला काही गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता.

यानंतर टिळक रस्त्यावर विद्यानंद बापट यांच्यावर संतोष चव्हाण याने हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर संतोष चव्हाणचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

मारहाणीनंतर संतोष चव्हाणचा मस्तवालपणा

हल्ल्यानंतर संतोष चव्हाणने केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

या व्हिडीओमध्ये तो, ‘याला अजून मारायला पाहिजे होतं. जो गणेशोत्सवाबद्दल बोलेल, त्याला असंच कानामागे देणार,’ अशा आशयाचं वक्तव्य करताना दिसत आहे.

या वक्तव्यामुळे हल्ल्यानंतरही संतोष चव्हाणच्या भूमिकेत कोणताही पश्चात्ताप दिसत नसल्याची टीका होत आहे. या प्रकरणावरून पुण्यात संताप व्यक्त केला जात आहे.

संतोष चव्हाणवर यापूर्वीही गुन्हे?

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष चव्हाण याच्यावर पुण्यात यापूर्वीही काही गुन्हे दाखल असल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये मारामारी आणि कट रचण्यासारख्या प्रकरणांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

त्याने यापूर्वी आपल्या वडिलांवरही हात उचलल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या दाव्यांची अधिकृत पुष्टी होणे बाकी आहे.

संतोष चव्हाण दरवर्षी दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करत असल्याचंही सांगितलं जात आहे.

यंदा दहीहंडी आणि गणेशोत्सवातील डीजेबाबत असलेल्या निर्बंधांवरून त्याच्या मनात नाराजी होती, असा दावा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर त्याने बापट यांच्यावर हल्ला केल्याचं बोललं जात आहे.

‘मुद्द्याचं उत्तर गुद्द्याने द्यायचं नसतं’

हल्ल्यानंतर विद्यानंद बापट यांनीही आपली प्रतिक्रिया दिली. पत्रकारांशी बोलत असताना एक व्यक्ती आली आणि त्याने आपल्यावर हल्ला केला, असा दावा बापट यांनी केला.

आपण सशस्त्र नव्हतो आणि पोलीसही जवळ नव्हते, हे पाहून हल्ला करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं.

या घटनेचे सीसीटीव्ही आणि इतर व्हिडीओ फुटेज पोलिसांनी तपासून कठोर कारवाई करावी, अशी मागणी बापट यांनी केली. ‘मुद्द्याचं उत्तर गुद्द्याने द्यायचं नसतं, हे त्याला कळायला हवं,’ असं म्हणत त्यांनी संतोष चव्हाणवर टीका केली.

गणेशोत्सवातील डीजेच्या मुद्द्यावरून सुरू झालेला हा वाद आता थेट मारहाणीपर्यंत पोहोचल्याने पुण्यात या प्रकरणाची चर्चा सुरू आहे.

या प्रकरणात पोलिसांच्या पुढील तपासातून हल्ल्यामागचं नेमकं कारण आणि या घटनेशी संबंधित इतर बाबी स्पष्ट होणार आहेत.


4
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!