तळेगाव येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार यांच्यात झालेल्या चर्चेने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस शरद पवार यांच्यातील चर्चेवर राजकीय चर्चा रंगली
पुणे: पुण्यातील तळेगाव येथे आयोजित एका खाजगी कार्यक्रमात महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत वेगळ्या ध्रुवांवर असलेले दिग्गज नेते एकाच मंचावर एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.
या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) ज्येष्ठ नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी नेतेमंडळींमध्ये झालेल्या अंतर्गत संवादाची दृश्ये कॅमेऱ्यात कैद झाल्याने सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.
चर्चा नेमकी कोणत्या विषयावर?
कार्यक्रमादरम्यान जयंत पाटील यांनी स्वतःहून पुढे जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला. विशेष म्हणजे, यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार हेदेखील तिथेच उपस्थित होते.
जयंत पाटील आणि फडणवीस यांच्यातील या संवादानंतर लगेचच शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातही बराच वेळ चर्चा झाली.
राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारे हे प्रमुख नेते एकमेकांशी अत्यंत मोकळेपणाने संवाद साधताना दिसल्याने, या भेटीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबत सर्वांनाच मोठी उत्सुकता लागली आहे.
भेटीमागचे नेमके कारण काय?
या दोन्ही नेत्यांमधील चर्चेचा नेमका विषय काय होता, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
मात्र, काही महिन्यांपूर्वी जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या.
जरी पाटील यांनी या चर्चा फेटाळून लावल्या असल्या, तरी त्यांनी शासकीय निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट गाजली होती.
त्यातच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चाही अधूनमधून सुरू असतात.
अशा पार्श्वभूमीवर या चार बड्या नेत्यांचे एकाच मंचावर येणे आणि त्यांच्यात झालेली चर्चा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
महाराष्ट्राची राजकीय संस्कृती की नवे संकेत?
महाराष्ट्राच्या राजकारणाला वैचारिक मतभेद बाजूला ठेवून सामाजिक सलोखा जपण्याची मोठी परंपरा आहे.
यशवंतराव चव्हाणांपासून चालत आलेली ही राजकीय संस्कृती म्हणून या भेटीकडे पाहिले जाऊ शकते.
मात्र, गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या मोठ्या उलथापालथींमुळे विरोधक जेव्हा जेव्हा एकत्र येतात, तेव्हा त्यामागे काहीतरी मोठी राजकीय गणिते असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तळेगावातील या भेटी केवळ औपचारिक होत्या की यामागे काही नवे राजकीय संकेत दडले आहेत, हे येणारा काळच स्पष्ट करेल.









