Police News: पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई: ४,६०० किमीचा थरारक पाठलाग करत हरियाणातून ३ सराईत चोरटे गजाआड; २३ लाखांचा मुद्देमाल जप्त


पुणे पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत चार हजार किलोमीटरचा थरारक पडला करून तीन सराईत चोरट्यांना ताब्यात घेतले आहे.

पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई, ३ सराईत आरोपींना केले जेरबंद

पुणे: पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने अत्यंत धाडसी आणि कौशल्याने तपास करत ४ हजार ६०० किलोमीटरचा मोठा प्रवास केला.

गुजरात आणि हरियाणा पोलिसांच्या मदतीने पलवल (हरियाणा) येथून ३ सराईत आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली कार आणि चोरीचे दागिने असा एकूण २३ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

गुजरातच्या अरवली पोलीस ठाण्यात तीघे आरोपी

विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्याचा तपास सुरू होता. या गुन्ह्यातील आरोपी पलवल (हरियाणा) येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक उमेश कारके व तपास पथकाने तात्काळ नियोजन केले.

शोध सुरू असतानाच, हे आरोपी गुजरातच्या अरवली पोलीस ठाण्याच्या ताब्यात असल्याची माहिती मिळाली.

पुणे पोलिसांनी अरवली पोलिसांच्या मदतीने तिघांना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे

  • १) अजय समशेर विनोदकुमार रुपसिंग कोळी (वय २०, रा. समसाबाद, पलवल, हरियाणा)
  • २) अमन समशेर अनिल कुमार नारायणसिंग कोळी (वय २४, रा. आदर्श कॉलनी, पलवल, हरियाणा)
  • ३) दिपक समशेर राजुभाई सापसिंग (वय २१, रा. हिरानगर कॉलनी, पलवल, हरियाणा)

गणेशोत्सवातील गर्दीचा घेतला फायदा

पोलिस कोठडीदरम्यान आरोपींची कसून चौकशी केली असता, त्यांनी पुणे शहरातील गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीतील गर्दीचा फायदा घेऊन तब्बल ०९ गुन्हे केल्याची कबुली दिली.

आरोपींनी गुन्ह्यासाठी वापरलेली १० लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी एर्टिगा कार (HR 30 AC 3390) जप्त करण्यात आली आहे.

तसेच, या नऊ गुन्ह्यांमधील १३ लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

दोन महिन्यांत ६२ गुन्हे उघड, सव्वा कोटीचा माल जप्त

विश्रामबाग पोलिसांच्या या पथकाने गेल्या दोन महिन्यांत गुजरात, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा विविध राज्यांमध्ये फिरून कौशल्याने तपास केला.

या मोहिमेत वेगवेगळ्या प्रकारचे ६२ गुन्हे उघडकीस आणून तब्बल १ कोटी २३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

सदरची धडक कारवाई पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे, अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उप आयुक्त कृषीकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विकास भिंगारदिवे आणि रमेश लाहिगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कामगिरीत तपास पथकाचे अधिकारी सपोनि उमेश कारके, उपनिरीक्षक सत्यवान गेंड, मेहबुब मोकाशी तसेच अंमलदार सचिन कदम, नितीन मुंढे, महेश कदम, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, शशीकांत दरेकर, साहिल शेख, कैलास डुकरे, जाकीर मणियार, अनिस शेख, शिवदत्त गायकवाड, फिरोज इनामदार, अर्जुन थोरात आणि नितीन बाबर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!