Pune School News : पुण्यात खळबळबळ: नामांकित शाळेत ३ वर्षांच्या चिमुरड्याला बाथरूममध्ये कोंडले; शिक्षिका आणि व्यवस्थापिकेवर गुन्हा दाखल!


तीन वर्षाच्या मुलाला शाळेत बाथरूम मध्ये कोंडल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. शिक्षिका आणि व्यवस्थापक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात शिक्षिकेने विद्यार्थ्याला बाथरूम मध्ये कोंडले, गुन्हा दाखल

पुणे : पुण्यातील नामांकित शाळेत तीन वर्षांच्या चिमुरड्याला बाथरूममध्ये कोंडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी संबंधित शाळेच्या शिक्षिका आणि व्यवस्थापिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, संपूर्ण पुण्यात या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

पुण्यातील घोरपडी परिसरातील बी. टी. कवडे रोडवर एका नामांकित शाळेत ८ सप्टेंबर रोजी सकाळी ११.१५ ते दुपारी २.१५ च्या दरम्यान हा भयंकर प्रकार घडला.

येथील एका शिक्षिकेने अवघ्या तीन वर्षांच्या निष्पाप मुलाला बाथरूममध्ये कोंडून ठेवले आणि त्याच्यासोबत क्रूर वर्तन केले, असा आरोप पीडित मुलाच्या आईने केला आहे.

या छळामुळे घाबरलेल्या पालकांनी अखेर पोलिसांत धाव घेतली. आईच्या तक्रारीनंतर ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

शिक्षिका आणि व्यवस्थापिकेवर गुन्हा दाखल

या प्रकरणात पोलिसांनी शाळेची शिक्षिका मनिता आणि व्यवस्थापिका (मॅनेजर) सोनाली या दोघींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १२७(२), ३(५) आणि बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ च्या कलम ७५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मात्र, याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

शाळेकडून सीसीटीव्ही फुटेज लपवण्याचा प्रयत्न?

तपास अधिकारी आणि पोलीस उपनिरीक्षक रणजित म्हस्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी शाळा प्रशासनाकडे घटनेच्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज मागितले होते.

सुरुवातीला शाळा प्रशासनाने फुटेज देण्याचे मान्य केले, मात्र नंतर तांत्रिक कारणांचे दाखले देत फुटेज उपलब्ध होऊ शकले नसल्याचे सांगितले. शाळेच्या या भूमिकेमुळे संशय बळावला आहे.

डीव्हीआर जप्त, फॉरेन्सिक तपासणी होणार

पोलिसांनी तातडीने कारवाई करत मंगळवारी शाळेचा डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर (DVR) जप्त केला आहे.

हा डीव्हीआर आता न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला जाणार आहे.

फॉरेन्सिक तपासणीत डिलीट केलेले किंवा लपवलेले व्हिडिओ समोर आल्यास, आरोपींविरोधात गुन्ह्यामध्ये अतिरिक्त कलमे जोडली जातील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, दोषींवर कठोरतमा कारवाई करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!