Crime News Pune : मालकाऐवजी निष्पाप कामगाराची हत्या; कारेगाव गोळीबार प्रकरणाचा पोलिसांकडून पर्दाफाश, ५ आरोपी अटकेत


स्टोन क्रशर मालकाला मारण्याची सुपारी देण्यात आली होती, मात्र मारेकऱ्यांनी चुकीच्या ओळखीमुळे एका निष्पाप कामगारावर गोळी झाडून त्याची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.

मालकाला मारण्याची सुपारी, गोळीबार करून कामगाराची हत्या

पुणे/शिरूर: शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे घडलेल्या एका खळबळजनक गोळीबार प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत पर्दाफाश केला आहे.

जमिनीच्या वादातून स्टोन क्रशर मालकाला मारण्याची सुपारी देण्यात आली होती, मात्र मारेकऱ्यांनी चुकीच्या ओळखीमुळे एका निष्पाप कामगारावर गोळी झाडून त्याची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी पाच मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या असून, दोन आरोपी अद्याप फरार आहेत.

जमिनीचा वाद आणि हत्येची सुपारी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारेगावचा रहिवासी सार्थक कोहकडे (वय २४) आणि विकास नवले यांच्यात स्टोन क्रशर, सामायिक रस्ता आणि जागेवरून जुना वाद सुरू होता.

हा वाद टोकाला गेल्याने कोहकडेने नवले यांचा काटा काढण्याचे ठरवले. यासाठी त्याने तुषार तोडकर (वय २८, रा. पेठ, आंबेगाव) याला हत्येची सुपारी दिली.

तोडकरने ही सुपारी पिंपरी-चिंचवडमधील सराईत तडीपार गुन्हेगार संतोष मांजरे (वय ३७, रा. खेड) याच्याकडे सोपवली.

मालक समजून कामगाराचा गेम

सुपारी मिळाल्यानंतर संतोष मांजरेने आपल्या साथीदारांसह विकास नवले यांच्या हत्येचा कट रचला. मारेकरी कारेगाव येथील पाणी प्लँटवर पोहोचले.

मात्र, तिथे काम करत असलेले हमजा उस्मान शेख (वय ३९, मूळ रा. परभणी) यांनाच मारेकऱ्यांनी विकास नवले समजले. कोणतीही खातरजमा न करता मारेकऱ्यांनी हमजा यांच्या डोक्यात थेट गोळी झाडली.

गंभीर दुखापत झाल्याने हमजा यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी हमजा यांच्या पत्नी अबिताबी शेख यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाने फोडले बिंग

भरदिवसा झालेल्या या हत्येमुळे परिसरात भीतीचे वातावरण होते.

पुणे ग्रामीणचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि रांजणगावचे पोलिस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला.

घटनास्थळा परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनचे तांत्रिक विश्लेषण करून पोलिसांनी संशयितांचा शोध घेतला.

सापळा रचून केली पाच जणांना अटक

पोलिसांनी सापळा रचून सार्थक कोहकडे, तुषार तोडकर, संतोष मांजरे, विठ्ठल पिकळे (वय २७) आणि योगेश इडोळे (वय २८) या पाच जणांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

ही कामगिरी सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार, अनिल मोरडे, उपनिरीक्षक महेश डांगरे, तिडके, थोरात व अंमलदारांच्या पथकाने केली.

या गुन्ह्यातील पवन हुंडारे आणि पृथ्वी ऊर्फ भैय्या जाधव हे दोघे फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!