विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून संबंधित शिक्षकाविरुद्ध उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली आहे.
विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून शिक्षकाविरुद्ध गुन्हा
सोरतापवाडी (पुणे): पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील सोरतापवाडी येथील पुरोगामी माध्यमिक विद्यालयात एक संतापजनक प्रकार समोर आला आहे.
शाळेतील एका माध्यमिक विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून संबंधित शिक्षकाविरुद्ध उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली आहे.
विकासवर्धन बाबूराव वाघमारे ( रा. नायगाव, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे.
या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत असून शाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
शाळेच्या मैदानात आणि स्टाफ रूममध्ये गैरवर्तन
उरुळी कांचन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षकाने ७ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२.१५ वाजता आणि १३ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २.४५ वाजताच्या सुमारास शाळेच्या मैदानात तसेच स्टाफ रूममध्ये विद्यार्थिनीशी गैरवर्तन केले.
शिक्षकाने विद्यार्थिनीच्या पाठीवर, कमंरेवर, हातावर आणि गालावर स्पर्श केल्याची तक्रार दाखल झाली आहे.
पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
पीडित विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनंतर उरुळी कांचन पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
१४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८.२४ वाजता पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २७९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ७४, तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्याच्या कलम ८ आणि १२ अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी शिक्षकाला तात्काळ अटक करण्यात आली आहे.
शालेय प्रशासनावर प्रश्नचिन्ह
शिक्षकासारख्या पवित्र पेशाला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे पालकांमध्ये प्रचंड भीती आणि संतापाचे वातावरण आहे.
शाळेचे मैदान आणि स्टाफ रूमसारख्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने शाळेतील सीसीटीव्ही यंत्रणा, शिक्षकांच्या वर्तनावरील नियंत्रण आणि तक्रार निवारण व्यवस्थेच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास उरुळी कांचन पोलीस करत आहेत.









