Pune Election : एकनाथ शिंदे यांची वेगळी भूमिका, ‘पुणे शिक्षक’साठी भाजपच्या विरोधात बंडखोराला पाठिंबा जाहीर


पुणे शिक्षक मतदारसंघामध्ये शिवसेनेने बंडखोर अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. एकनाथ शिंदे यांची वेगळी भूमिका दिसत आहे.

बंडखोर उमेदवाराला पाठिंबा देऊन एकनाथ शिंदे यांची वेगळी भूमिका

पुणे : राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील अंतर्गत मतभेद आणि सुप्त संघर्ष आता पूर्णपणे चव्हाट्यावर आला आहे.

अमरावती शिक्षक मतदारसंघात भाजपच्या बंडखोरीमुळे आक्रमक झालेल्या शिवसेनेने (शिंदे गट) आता पुण्यात भाजपला ‘काँटे की टक्कर’ देण्याची तयारी केली आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघामध्ये शिवसेनेने भाजपचे अधिकृत उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्याऐवजी बंडखोर अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे.

स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भूमिकेची घोषणा केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी महायुतीमधील या मतभेदावर सूचक वक्तव्य केले. ते म्हणाले, “आम्ही सर्वजण महायुती म्हणून एकत्रितपणे ही निवडणूक लढवत आहोत. पाचही जागांवर महायुतीचेच उमेदवार निवडून येतील.

परंतु, पुणे शिक्षक मतदारसंघापुरता आमचा पाठिंबा सचिन सानप यांना राहील. काही ठिकाणी अपवाद असतात, त्यामुळे तिथे ही मैत्रीपूर्ण लढत असेल.”

दोनच दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सर्व जागा एकत्र लढणार असल्याचे जाहीर केले होते, मात्र शिंदेंच्या या निर्णयामुळे महायुतीमधील जागावाटपाचा घोळ पुन्हा समोर आला आहे.

अमरावतीचे उट्टे पुण्यात काढणार?

राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीकडून शिवसेनेचे किरण सरनाईक हे अधिकृत उमेदवार आहेत.

मात्र, त्यांच्याविरोधात भाजपचे बंडखोर दिलीप कडू यांनी तगडे आव्हान उभे केले आहे.

दिलीप कडू हे अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक राहिले असून त्यांना राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांचे पाठबळ असल्याची चर्चा आहे.

अमरावतीत भाजप आणि राष्ट्रवादीने अधिकृत उमेदवाराचे काम न केल्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेने आता पुण्यात त्याचे उट्टे काढण्याचे ठरवले आहे.

उदय सामंतांचे माजी ओएसडी रिंगणात

पुणे शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे मंगेश चिवटे यांनी आधी अर्ज भरला होता, परंतु महायुतीच्या शिस्तीसाठी त्यांनी नंतर माघार घेतली.

ही जागा भाजपला गेल्यानंतर शिवसेनेत तीव्र नाराजी होती. त्यातच आता शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांचे माजी ओएसडी (विशेष कार्य अधिकारी) राहिलेले सचिन सानप यांनी अपक्ष शड्डू ठोकल्यामुळे शिवसेनेला आयते कोलीत मिळाले आहे.

शिवसेनेने सानप यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करण्याचा निर्णय घेतला आहे.

संभाजीनगरमध्येही पडसाद उमटण्याची शक्यता

अमरावतीतील बंडखोरी आणि पुण्यात शिवसेनेने घेतलेली आक्रमक भूमिका याचे पडसाद आता मराठवाडा (संभाजीनगर) पदवीधर मतदारसंघातही उमटण्याची दाट शक्यता आहे.

जर अमरावतीत दिलीप कडू आणि संजय खोडके यांनी किरण सरनाईक यांना मदत केली नाही, तर शिवसेना संभाजीनगरमध्येही वेगळी चूल मांडणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

त्यामुळे महायुतीमधील हा अंतर्गत वाद आगामी निवडणुकीत कोणाला फटका बसवणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!