NCMC Card News | बस मध्ये NCMC कार्डाची सक्ती तात्पुरती स्थगित ठेवण्याचे आशिष शेलारांचे निर्देश


एसटी बस मध्ये NCMC कार्डाची सक्ती करू नये असे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे.

NCMC कार्डाची सक्ती करू नये, महामंडळाच्या अधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई : राज्यातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या प्रवास भाड्यातील सवलतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

एसटी प्रवासातील ५० टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी NCMC कार्डची सक्ती करण्यात आली होती.

मात्र, ही सक्ती तात्पुरती करू नये, असे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन महायुती सरकारने महिलांसाठी एसटी बसच्या प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती.

त्यानुसार राज्यातील महिलांना एसटीच्या प्रवासात ५० टक्के सवलत मिळते. याशिवाय ६५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनाही प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत दिली जाते.

तर ७५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी प्रवास मोफत आहे.

NCMC कार्ड काढण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा

दरम्यान, या सवलतीचा लाभ घेण्यासाठी NCMC कार्डची सक्ती करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला होता. यासाठी १ सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली होती.

१ सप्टेंबरनंतर NCMC कार्ड नसलेल्या महिलांना एसटीचे पूर्ण भाडे भरावे लागेल, असे महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले होते.

मात्र, आता या निर्णयाला तात्पुरता ब्रेक मिळण्याची शक्यता आहे. प्रवाशांना NCMC कार्ड काढण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा, तसेच कार्डसाठीची मुदत १ ऑक्टोबर किंवा १ नोव्हेंबर २०२६ पर्यंत वाढवण्याचा विचार करावा, असे निर्देश आशिष शेलार यांनी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

विशेषतः गौरी-गणपती उत्सवाच्या काळात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी NCMC कार्ड नसलेल्या प्रवाशांनाही सध्या मिळणारी एसटी भाड्यातील सवलत कायम ठेवावी, अशी भूमिका शेलार यांनी मांडली आहे.

त्यामुळे NCMC कार्ड नसल्यामुळे महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना पूर्ण भाडे भरावे लागणार का, याबाबत निर्माण झालेला संभ्रम काही प्रमाणात दूर होण्याची शक्यता आहे.

अंमलबजावणी कशी केली जाते याकडे प्रवाशांचे लक्ष

मात्र, शासन निर्णयानुसार NCMC कार्डची सक्ती कायम असल्याने आशिष शेलार यांच्या निर्देशानंतर या निर्णयाची अंमलबजावणी कशी केली जाते, याकडे आता प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

या निर्णयामुळे परिवहन विभागातील अधिकार आणि निर्णयांबाबतही राजकीय चर्चा रंगण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक हे राज्याचे परिवहन मंत्री आहेत.

यापूर्वी मराठी भाषा सक्तीच्या निर्णयावरूनही सरकारमध्ये चर्चा झाली होती. आता NCMC कार्डच्या सक्तीबाबत देण्यात आलेल्या नव्या निर्देशांमुळे परिवहन विभागातील निर्णयप्रक्रियेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे.


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!