पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर तसेच l मुलावर चाकूने हल्ला केल्याचा आरोप असलेल्या माजी सैनिक महेंद्र दौंडकर यानेही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
धक्कादायक घटना, माजी सैनिक महेंद्र दौंडकर याचे कृत्य
राजगुरूनगर : पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर तसेच १७ वर्षीय मुलावर चाकूने हल्ला केल्याचा आरोप असलेल्या माजी सैनिक महेंद्र दौंडकर यानेही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
चांडोली गावच्या हद्दीत भीमा नदीकाठी एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत महेंद्र दौंडकर याचा मृतदेह आढळून आला.
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून दौंडकर कुटुंबावर ओढवलेल्या या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
बहिणीशी बोलत नसल्याचा राग
मिळालेल्या माहितीनुसार, राजगुरूनगर येथे महेंद्र दौंडकर याने त्याची पत्नी दीपा दौंडकर (वय ४०) हिचा गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे.
तसेच त्यांचा १७ वर्षीय मुलगा अथर्व याच्यावरही चाकूने हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी अथर्व यानेच पोलिसांत फिर्याद दिली होती.
अथर्वने दिलेल्या फिर्यादीनुसार, पत्नी दीपा ही बहिणीशी बोलत नसल्याने महेंद्र दौंडकर याला राग आला होता.
याच कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. या वादातून महेंद्रने दीपाचा गळा आवळून तिचा खून केल्याचा आरोप आहे.
यानंतर अथर्व हा आईला उठवण्यासाठी गेला असता ती मृतावस्थेत असल्याचे त्याच्या लक्षात आले.
त्यावेळी महेंद्रने अथर्ववरही चाकूने हल्ला केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर महेंद्र दौंडकर घटनास्थळावरून बेपत्ता झाला होता.
महेंद्र दौंडकरचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत
याप्रकरणी खेड पोलिसांनी गुन्हा दाखल करून महेंद्रचा शोध सुरू केला होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली होती. मात्र, बराच शोध घेऊनही त्याचा ठावठिकाणा लागला नव्हता.
दरम्यान, गुरुवारी सकाळी चांडोली गावच्या हद्दीत भीमा नदीकाठी एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत महेंद्र दौंडकर याचा मृतदेह आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला.
पत्नीच्या हत्येचा आरोप असलेल्या महेंद्र दौंडकर याचाही मृत्यू झाल्याने या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. घटनेचा पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.









