भरधाव मोटारीने रस्ता ओलांडणाऱ्या तीन महिलांना धडक दिल्याने, झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार झाली, ही मोटर लोकप्रतिनिधीचा मुलगा चालवत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
भरधाव मोटारीने दिली तीन महिलांना धडक
जळगाव : जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात बिलाखेड गावाजवळ रस्ता ओलांडणाऱ्या तीन महिलांना भरधाव मोटारीने धडक दिल्याची भीषण घटना घडली.
या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
मात्र, अपघाताला १८ तास उलटूनही संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल न झाल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. चालक हा एका लोकप्रतिनिधीचा मुलगा असल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास बिलाखेड गावाजवळ तीन महिला रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी चाळीसगावकडून मालेगावच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटारीने तिघींना जोरदार धडक दिली.
या अपघातात सुशीलाबाई वंजारी (५०, रा. रामवाडी, बिलाखेड) यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुनीता संजय वंजारी (४०) आणि संगीता पोपट कोळी (४५) या गंभीर जखमी झाल्या आहेत. दोघींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर ग्रामस्थांचा संताप
अपघाताची तीव्रता मोठी होती. सुशीलाबाई वंजारी यांचा मृतदेह मोटारीच्या समोरील काच फोडून चालकाच्या बाजूच्या आतील भागात लोंबकळत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले.
ग्रामस्थांनी जखमी महिलांना तातडीने रुग्णालयात दाखल केले आणि पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमितकुमार मनेळ हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले.
वारंवार अपघात होऊनही उपाययोजना नाहीत
बिलाखेड परिसरात वारंवार अपघात होत असूनही आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
तसेच अपघातास कारणीभूत ठरलेल्या चालकावर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी मंगळवारी रात्री रास्ता रोको आंदोलन केले. बुधवारी दुपारीही ग्रामस्थांनी पुन्हा रस्ता अडवून आंदोलन केले.
पोलिसांनी ग्रामस्थांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाविरुद्ध ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली.
चालक लोकप्रतिनिधीचा मुलगा असल्याचा दावा
या अपघातानंतर चालकाच्या राजकीय पार्श्वभूमीची चर्चा सुरू झाली आहे. संबंधित चालक हा एका लोकप्रतिनिधीचा मुलगा असल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे.
तसेच अपघाताच्या वेळी चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
मात्र, चालक हा लोकप्रतिनिधीचा मुलगा असल्याची किंवा तो मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याची अधिकृत पुष्टी पोलिसांकडून अद्याप करण्यात आलेली नाही. त्यामुळे या दोन्ही दाव्यांची चौकशी होणे आवश्यक आहे.
१८ तासांनंतरही गुन्हा दाखल का नाही?
अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून दोन महिला गंभीर जखमी आहेत. चालक पोलिसांच्या ताब्यात असल्याचे सांगण्यात येत आहे.
असे असतानाही घटनेला सुमारे १८ तास उलटून गेल्यानंतरही गुन्हा दाखल न झाल्याने ग्रामस्थांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केला आहे.
चालक पोलिसांच्या ताब्यात असताना आणि अपघातात मृत्यू तसेच गंभीर दुखापत झालेली असताना गुन्हा दाखल करण्यास विलंब का होत आहे, असा सवाल ग्रामस्थांकडून केला जात आहे.
तसेच राजकीय दबावामुळे चालकाची अपघातानंतर तातडीने वैद्यकीय तपासणी करण्यात आली नसावी, अशी शंकाही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, ग्रामस्थांकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांनी सांगितले आहे.
या प्रकरणात चालकाची वैद्यकीय तपासणी, अपघाताचे नेमके कारण, वाहनाचा वेग आणि चालकाची भूमिका याबाबत पोलिसांच्या तपासातून काय निष्पन्न होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.









