विनापरवाना ड्रोन उडवून चित्रीकरण केल्याप्रकरणी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्यासह पाच जणांविरोधात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनापरवाना ड्रोन उडवून चित्रीकरण, गुन्हा दाखल
पुणे: पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान विनापरवाना ड्रोन उडवून चित्रीकरण केल्याप्रकरणी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्यासह पाच जणांविरोधात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी या कारवाईत ५० हजार रुपये किमतीचा ड्रोन कॅमेरा आणि रिमोट कंट्रोलर जप्त केला आहे.
या प्रकरणात पोलीस हवालदार युवराज भारत टोळे यांनी अधिकृत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, प्रमोद पाटील, दिगंबर भारत खारे (ड्रोन ऑपरेटर), ऋषिकेश गांगुर्डे आणि अक्षय कांबळे यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम २२३ अंतर्गत (लोकसेवकाच्या आदेशाचा अवमान करणे) गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७:३० च्या सुमारास एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते.
यावेळी आंदोलनाचे चित्रीकरण करण्यासाठी हवेत ड्रोन उडवला जात असल्याचे कर्तव्यवर असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास आले.
पोलिसांनी शोध घेतला असता, घटनास्थळामागील खुल्या मैदानातून दिगंबर खारे हा तरुण ड्रोन ऑपरेटर करत असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी त्याच्याकडे ड्रोनला उडवण्याच्या अधिकृत परवान्याबाबत चौकशी केली, मात्र त्याच्याकडे कोणताही परवाना नव्हता.
प्राथमिक चौकशीत, आंदोलनाचे मुख्य आयोजक आणि युवक काँग्रेसचे नेते यांच्या सांगण्यावरूनच हे चित्रीकरण केले जात असल्याचे समोर आले.
सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी तात्काळ ड्रोनला खाली उतरवण्याचे आदेश दिले आणि १० ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
आंदोलकांवरील हा दुसरा गुन्हा
एमपीएससी परीक्षा आणि भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी विद्यार्थ्यांनी हे आंदोलन पुकारले होते.
यापूर्वी, ९ ऑक्टोबर रोजी विश्रामबाग पोलिसांनी परवानगीशिवाय बेकायदेशीर जमाव जमवणे, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे आणि सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी १५ प्रमुख आंदोलक आणि आयोजकांवर पहिला गंभीर गुन्हा दाखल केला होता.
यामध्येही प्रमोद पाटील, अक्षय कांबळे आणि ऋषिकेश गांगुर्डे यांचा समावेश होता.
त्यानंतर आता विनापरवाना ड्रोनउडवल्याप्रकरणी हा दुसरा गुन्हा दाखल झाल्याने आंदोलक आणि युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शोभा टेळी करत आहेत.









