मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये अधिकृतपणे दुष्काळ जाहीर केला आहे.
उत्तर महाराष्ट्रातील ४९ तालुक्यांत दुष्काळ जाहीर
पुणे: राज्यात पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेल्या गंभीर टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अखेर मोठा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये अधिकृतपणे दुष्काळ जाहीर केला आहे. महाराष्ट्रातील एकूण ३५८ तालुक्यांपैकी तब्बल ७५ टक्के भागात ‘ट्रिगर-१’ लागू झाल्याने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
यामध्ये नाशिक महसूल विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहिल्यानगर या पाच जिल्ह्यांतील ४९ तालुक्यांचा समावेश आहे.
दुष्काळ जाहीर करण्यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः विदर्भ आणि मराठवाड्यातील टंचाईग्रस्त भागाचा दौरा करून थेट शेताच्या बांधावर जात पिकांच्या नुकसानीची पाहणी केली होती व शेतकऱ्यांशी संवाद साधला होता.
तुमच्या जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित:
- नाशिक जिल्हा (१० तालुके): मालेगाव, बागलाण, कळवण, नांदगाव, सुरगाणा, इगतपुरी, पेठ, सिन्नर, येवला आणि देवळा.
- जळगाव जिल्हा (१५ तालुके): एरंडोल, पारोळा, धरणगाव, चोपडा, पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर आणि यावल.
- धुळे जिल्हा (४ तालुके): धुळे, साक्री, सिंदखेडा आणि शिरपूर.
- नंदुरबार जिल्हा (६ तालुके): अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर, तळोदा आणि अक्राणी.
- अहिल्यानगर जिल्हा (१४ तालुके): नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर आणि राहता.
५ ऑक्टोबरपासून होणार ‘जिओ-टॅगिंग’ पंचनामे
नुकसानीचे अचूक आकलन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष पंचनाम्याची कारवाई सुरू करण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
या प्रक्रियेत पारदर्शकता राहावी यासाठी पिकांच्या सद्यस्थितीचे GPS लोकेशनसह छायाचित्र (Geo-tagged photos) संकलित करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
येत्या दोन दिवसांत यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय (GR) जारी केला जाणार आहे.









