Kothrud News : कोथरूडमध्ये 480 वृक्षतोडीविरोधात नागरिकांचा एल्गार; न्यायालयात जाण्याचा इशारा


कोथरूडमध्ये 480 वृक्षतोडीविरोधात नागरिकांनी विरोध करत न्यायालयात जाण्याचा इशारा देखील दिला आहे. तूर्तास हे काम थांबले आहे.

वृक्षतोडी विरोधात नागरिक न्यायालयात जाणार

पुणे: कोथरूड येथील विकास आराखड्यातील (डीपी) २० मीटर रुंदीच्या प्रस्तावित रस्त्यासाठी सुमारे ४८० हून अधिक वृक्षांची कत्तल करण्याचा घाट पुणे महानगरपालिका प्रशासनाने घातला आहे.

महापालिकेच्या या पर्यावरणविरोधी धोरणाविरोधात कोथरूडमधील स्थानिक रहिवासी आणि पर्यावरणप्रेमी अत्यंत आक्रमक झाले आहेत.

या वृक्षतोडीला तीव्र विरोध करण्यासाठी रविवारी नागरिकांनी सिद्धार्थ टॉवर्स येथे एकत्र येत जोरदार निदर्शने केली.

कोणत्याही परिस्थितीत ही झाडे तोडू देणार नाही, असा निर्धार करत नागरिकांनी प्रशासनाचा निषेध केला.

झाडे वाचवण्यासाठी आंदोलनाची व्याप्ती आणखी वाढवली जाईल आणि गरज पडल्यास न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशारा या वेळी आंदोलकांनी दिला आहे.

वृक्षतोड विरोधात न्यायालयात जाणार
वृक्षतोड विरोधात न्यायालयात जाणार

तीव्र विरोधामुळे काम तात्पुरते स्थगित

कोथरूडमधील मृत्युंजयेश्वर मंदिरामागील सर्व्हे क्रमांक १२/२ आणि १२/५ या सरकारी जागेतून हा रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे.

या रस्त्याच्या निर्मितीसाठी प्रशासनाने मागील आठवड्यात अचानक येथील झाडे तोडण्यास सुरुवात केली होती.

मात्र, याची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी आणि पर्यावरणप्रेमींनी घटनास्थळी धाव घेत प्रशासनाला जाब विचारला.

नागरिकांच्या या तीव्र आणि संघटित विरोधामुळे महापालिका प्रशासनाला वृक्षतोडीचे काम तात्पुरते थांबवावे लागले आहे.

महापालिकेला कायदेशीर नोटीस

या संपूर्ण प्रकरणाची पर्यावरणप्रेमींनी गंभीर दखल घेतली आहे.

रस्त्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड नियमबाह्य असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

या प्रकरणी प्रशासनाला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली असून, माहिती अधिकारांतर्गत (RTI) या प्रकल्पाची संपूर्ण माहिती आणि मंजुरीची कागदपत्रेही मागवण्यात आली आहेत.

पर्यावरणप्रेमींचा सवाल

“विकासाच्या नावाखाली शहरातील फुफ्फुसे असलेल्या शेकडो जुन्या झाडांची कत्तल करणे थांबवले पाहिजे. महापालिकेने पर्यायी मार्गांचा विचार करावा,” अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

या आंदोलनात ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.

प्रशासनाने वृक्षतोडीचा निर्णय मागे न घेतल्यास हे आंदोलन संपूर्ण पुणे शहरात पसरवण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!