Jalgaon News | गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ अभियानात जळगाव जिल्ह्यात 1.33 कोटी घनमीटर गाळ काढला


जळगाव जिल्ह्यात जलसाठ्यांची क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने राबविण्यात येत असलेल्या ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ अभियानाला चांगली गती मिळाली आहे.

जळगाव जिल्ह्यात सिंचन क्षमता वाढविण्यासाठी उपक्रम

जळगाव जिल्ह्यात जलसाठ्यांची साठवण क्षमता आणि सिंचन क्षमता वाढविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ अभियानाला चांगली गती मिळाली आहे.

या योजनेअंतर्गत धरणे, तलाव आणि नाल्यांमधील गाळ काढून जलसाठ्यांची मूळ क्षमता पुनर्संचयित करणे, पाण्याचा प्रवाह नियंत्रित करणे तसेच शेतीसाठी उपलब्ध पाण्याचा अधिक प्रभावी वापर करणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.

गाळ काढल्यानंतर तो शिवारामध्ये पसरवून जमिनीची सुपीकता वाढविण्यावरही भर देण्यात येतो.

जळगाव जिल्ह्यात झाली 13 कामे पूर्ण

तलावातील गाळ काढण्यासाठी एकूण 16 कामे नियोजित करण्यात आली होती. त्यापैकी 13 कामे पूर्ण झाली असून, या कामांतून 6648294.6 घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. उर्वरित तीन कामे पूर्ण झाल्यानंतर तलावांची साठवण क्षमता आणखी वाढण्याची शक्यता आहे. नालाखोलीकरणाची 38 कामे नियोजित होती. त्यापैकी 33 कामे पूर्ण झाली असून, या कामांतून 6632282.8 घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.

नाल्यांची खोली आणि वहनक्षमता वाढल्यामुळे पावसाचे पाणी अधिक वेगाने व व्यवस्थितपणे जलसाठ्यांकडे पोहोचण्यास मदत होणार आहे.

तसेच पाण्याचा प्रवाह नियंत्रित होऊन पाणी जमिनीत मुरण्याचे प्रमाण वाढण्यासही हातभार लागणार आहे.

जलसाठ्यांची मूळ क्षमता पुनर्संचयित होणार

तलावातील गाळ काढण्याची तीन आणि नाला खोलीकरणाची पाच, अशी एकूण आठ कामे अद्याप पूर्ण होणे बाकी आहेत.

जलसाठ्यांमधील गाळ काढल्यामुळे केवळ जलसाठ्यांची मूळ क्षमता पुनर्संचयित होणार, उपलब्ध पाण्याचा सिंचनासाठी अधिक प्रभावीपणे वापर करता येणार आहे. गाळामुळे कमी झालेली साठवण क्षमता मोकळी झाल्याने त्याच जलसाठ्यात अधिक पाणी साठविणे शक्य होईल. परिणामी पिकांसाठी सिंचनाचे आवर्तन वाढण्यास, सिंचन क्षेत्राचा विस्तार होण्यास आणि शेती उत्पादनाला स्थैर्य मिळण्यास मदत होऊ शकते.

या अभियानामुळे जळगाव जिल्ह्यातील जलसाठे अधिक सक्षम होत असून, शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होत आहे.

उर्वरित कामे लवकर पूर्ण झाल्यास जलसाठ्यांची क्षमता आणखी वाढेल आणि जिल्ह्यातील कृषी क्षेत्राला मोठा दिलासा मिळेल.

जळगाव जिल्ह्यात अभियानाची स्थिती

  • तलावातील नियोजित कामे : १६
  • पूर्ण झालेली कामे : १३
  • शिल्लक कामे : ३
  • तलावातून काढलेला गाळ : ६६,४८,२९८.६ घनमीटर.
  • नालाखोलीकरणाची नियोजित कामे : ३८
  • पूर्ण झालेली कामे : ३३
  • शिल्लक कामे : ५
  • नाल्यांमधून काढलेला गाळ : ६६,३२,२८२.८ घनमीटर.
  • तलाव नाल्यांमधून आतापर्यंत काढलेला गाळ : १,३२,८०,५८१.४ घनमीटर.
  • प्रलंबित कामे : ८

4
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!