स्मार्ट मीटर मुळे थकबाकीपोटी वीजपुरवठा आपोआप खंडित होत असतानाही अनधिकृतपणे वीज जोडणी करून वीज वापर करणाऱ्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे.
स्मार्ट मीटर बसवल्यानंतरही वीज चोरी
जळगाव शहरात स्मार्ट मीटर बसवल्यानंतरही थकबाकी न भरता अनधिकृतपणे वीज वापरणाऱ्या ग्राहकांविरोधात महावितरणने कारवाईचा बडगा उगारला आहे.
स्मार्ट मीटरमुळे थकबाकीपोटी वीजपुरवठा आपोआप खंडित होत असतानाही काही ग्राहक वीज वाहिनीवर आकडा टाकून चोरी करत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.
सोमवारी आणखी दोन अशा ग्राहकांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.
यापूर्वी शुक्रवारी तीन ग्राहकांवर कारवाई झाली होती. स्मार्ट मीटरनंतरही वीजचोरी सुरू असल्याने महावितरणसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे.
आकडा टाकून अनधिकृत वीज वापर
नितीन साहित्यानगर, सुप्रीम कॉलनी परिसरातील रहिवासी संजय भगवान महाजन यांच्या वीज जोडणीचा थकबाकीमुळे स्मार्ट मीटरमधून पुरवठा खंडित करण्यात आला होता.
मात्र त्यांनी थकबाकी न भरता घराशेजारील लघुदाब वीज वाहिनीवर आकडा टाकून अनधिकृत वीज वापर सुरू केला. तपासणीत सुमारे 2120 रुपयांची वीजचोरी झाल्याचे समोर आले.
दुसऱ्या प्रकरणात सुप्रीम कॉलनीतील अकिब शाह अब्दुल रहमान शाह यांचाही स्मार्ट मीटरद्वारे पुरवठा बंद करण्यात आला होता. तरीही त्यांनी वीज वाहिनीवर आकडा टाकून वीज वापरली. यात सुमारे 1230 रुपयांची चोरी आढळली.
सहायक अभियंता यांच्या तक्रारीवरून गुन्हे
महावितरणचे सहायक अभियंता विशाल नेमाडे यांच्या तक्रारीवरून दोन्ही ग्राहकांविरोधात भारतीय विद्युत कायद्यातील कलम 135 अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले. थकबाकीदार ग्राहकांनी वीज बिल भरावे आणि अधिकृत पुरवठा सुरू करून घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. स्
मार्ट मीटर बसविल्यानंतरही परस्पर जोडणी होत असल्याने विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
ही पथके परिसरनिहाय तपासणी करत असून, अनधिकृत वापर आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल.
स्मार्ट मीटर बसवणे पुरेसे नाही
स्मार्ट मीटरमुळे थकबाकीपोटी पुरवठा आपोआप खंडित होण्याची सुविधा उपलब्ध झाली असली, तरी त्यानंतर ग्राहकांकडून होणारी अनधिकृत जोडणी महावितरणसमोर आव्हान ठरत आहे.
केवळ स्मार्ट मीटर बसवणे पुरेसे नाही, तर त्यानंतरच्या देखरेखीची आणि तातडीच्या कारवाईची गरज आहे.
जळगाव शहरात सलग अशा प्रकरणांत कारवाई सुरू झाल्याने थकबाकीदारांना स्पष्ट संदेश मिळाला आहे की, बिल न भरता वीज चोरी केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.
स्मार्ट मीटरच्या माध्यमातून पारदर्शक व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असताना ग्राहकांनी सहकार्य करावे, असे महावितरणचे म्हणणे आहे.









