जळगाव जिल्ह्यात पुरामुळे 71 गावांतील 3652 पूरबाधित कुटुंबांना अन्नधान्यासह संसारोपयोगी साहित्याच्या किटचे वाटप करण्यात येणार आहे.
पूरबाधित कुटुंबांना दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासन सक्रिय
जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घरात पाणी शिरून बाधित झालेल्या पूरबाधित कुटुंबांना दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासन सक्रिय झाले आहे.
महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यांच्या आणि उपलब्ध माहितीच्या आधारे एकूण 71 गावांतील 3652 पूरबाधित कुटुंबांना अन्नधान्यासह संसारोपयोगी साहित्याच्या किटचे वाटप करण्यात येणार आहे.
यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती निवारणार्थ सहाय्य निधीतून 24 लाख 14 हजार 280 रुपयांची तरतूद केली असून ही रक्कम बाधित तालुक्यांना वाटप करण्यात आली आहे.
अमळनेर तालुक्यात सर्वाधिक 29 गावे
तालुकानिहाय आकडेवारीनुसार अमळनेर तालुक्यात सर्वाधिक 29 गावे आणि 2207 पूरबाधित कुटुंबे असून येथे सर्वाधिक मदत राखीव ठेवण्यात आली आहे.
त्यानंतर पारोळा तालुक्यात 644, चाळीसगावमध्ये 411, भडगावमध्ये 235 पूरबाधित कुटुंबांना मदत दिली जाणार आहे.
जळगाव तालुक्यातील 65, एरंडोलमधील 37, भुसावळमधील 30, पाचोऱ्यातील 12 आणि रावेरमधील 11 परिवारांचाही लाभार्थ्यांमध्ये समावेश आहे.
चोपडा, धरणगाव, मुक्ताईनगर, जामनेर, बोदवड आणि यावल या तालुक्यांमध्ये मात्र या निकषानुसार पूरबाधित कुटुंबांची नोंद झालेली नाही.
कुटुंबांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान
पुरामुळे अनेक कुटुंबांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.
अशा पूरबाधित कुटुंबांना तातडीने दिलासा मिळावा यासाठी शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने मदत किट वाटपाची तयारी पूर्ण केली आहे.
संबंधित तहसील कार्यालयांमार्फत लाभार्थ्यांची यादी अंतिम करण्यात येत असून लवकरच किटचे वितरण सुरू होणार आहे.
जिल्हा प्रशासनाने प्रति कुटुंब 650 रुपये किंमतीच्या वस्तूंसह धान्य पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.
या किटमध्ये तेल, साखर, चहा पावडर, चटणी, मीठ, पेस्ट, साबणासह डाळ यांचा समावेश आहे.
ही मदत पूर बाधित कुटुंबांना तात्काळ उपलब्ध करून देण्यात येईल.
जिल्ह्यात शेतपिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान
जिल्ह्यात शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक घरांची पडझड झाली तर काहींचा संसार पाण्यात वाहून गेला.
मंत्र्यांसह लोकप्रतिनिधींनी परिसराची पाहणी केल्यानंतर मदतीसाठी विशेष पॅकेज जाहीर केले जाईल, अशी अपेक्षा पूर बाधित नुकसानग्रस्तांना होती.
मात्र पालघरसह अन्य जिल्ह्यांत काही निकषांद्वारे मदतीचे पॅकेज जाहीर झाले असले तरी जळगाव जिल्ह्यासाठी अद्याप कुठलीही विशेष तरतूद न केल्याने पूर बाधित नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
जिल्हा प्रशासनाने सध्याची मदत किट वाटप प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून पूरबाधित कुटुंबांना तात्काळ दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.
आगामी काळात शासनाकडून अधिक मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









