Jalgaon Crime News | जळगाव-ममुराबाद रस्त्यावर भीषण अपघात; कावड यात्रेतील १० वर्षीय मुलाचा मृत्यू, जमावाने आयशर पेटवला


जळगाव-ममुराबाद रस्त्यावर झालेल्या अपघात मुळे दहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याने जमावाने आयशर ट्रक पेटवून दिला आहे.

आयशर ट्रकच्या धडकेने झाला अपघात, जमावाचा संताप अनावर

जळगाव : कावड यात्रेच्या उत्साहात सहभागी झालेल्या भाविकांवर सोमवारी सायंकाळी काळाने घाला घातला. जळगाव-ममुराबाद रस्त्यावर म्हाळसादेवी मंदिराजवळ झालेल्या भीषण अपघात मध्ये १० वर्षीय प्रबल राजू गवळी या चिमुरड्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या दुर्घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि नागरिकांनी रस्त्यावर ठिय्या देत वाहतूक रोखली. त्यानंतर अपघातग्रस्त आयशर वाहनाला जमावाकडून आग लावण्यात आल्याने परिस्थिती अधिकच चिघळली.

यात्रा पूर्ण झाल्यावर भाविक परतीच्या मार्गावर

मिळालेल्या माहितीनुसार, शनिपेठ परिसरातील गवळीवाड्यातून कावड यात्रा म्हाळसादेवी मंदिराकडे आली होती.

यात्रा पूर्ण झाल्यानंतर भाविक परतीच्या मार्गावर होते. त्याचवेळी जळगावकडून चोपड्याच्या दिशेने जाणाऱ्या MH-20-EG-3593 क्रमांकाच्या आयशर वाहनाची प्रबलला धडक बसली.

धडक इतकी भीषण होती की, प्रबलला वाहनाने काही अंतर ओढत नेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. गंभीर दुखापत झाल्याने प्रबलचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. चिमुरड्याचा मृत्यू झाल्याचे समोर येताच कुटुंबीयांचा आक्रोश सुरू झाला.

एकुलता एक मुलगा गमावल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर

प्रबल हा गवळी कुटुंबातील एकुलता एक मुलगा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्याच्या मृत्यूने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

कावड यात्रेच्या भक्तिमय वातावरणात घडलेल्या या दुर्घटनेने परिसरातील आनंदाचे वातावरण काही क्षणांतच शोकाकुल झाले.

दरम्यान, अपघाताला कारणीभूत ठरलेल्या चालकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करत संतप्त नातेवाईक आणि नागरिकांनी रस्त्यावर ठिय्या दिला.

चालकावर कारवाई होईपर्यंत मृतदेह घटनास्थळावरून हलवू नये, अशी भूमिकाही नातेवाईकांनी घेतली. त्यामुळे जळगाव-ममुराबाद मार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली.

संतप्त जमावाकडून आयशर वाहन पेटवले

परिस्थिती तणावपूर्ण असतानाच संतप्त जमावाने अपघातग्रस्त आयशर वाहनाला आग लावली.

हे वाहन किराणा मालाने भरलेले असल्याने आगीने काही वेळातच मोठे रूप धारण केले. वाहनातून मोठ्या प्रमाणात धूर आणि आगीचे लोळ उठल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

जमावाला शांत करण्याचा प्रयत्न सुरू असताना तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्याशी धक्काबुक्की झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दीड तास वाहतूक ठप्प

सायंकाळी सुमारे पाच वाजल्यापासून साडेसहा वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक ठप्प होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह अतिरिक्त पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला.

दरम्यान, पोलिसांनी आयशर चालकाला ताब्यात घेतले असून या अपघात बाबत पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रबलच्या नातेवाईकांकडून करण्यात आली आहे.

कावड यात्रेच्या उत्साहात घडलेल्या या भीषण अपघात ने संपूर्ण परिसर हादरला असून, अवघ्या १० वर्षांच्या प्रबलच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


4
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!