खराडी परिसरात एका नामांकित स्पामध्ये सुरू असलेल्या हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
खराडी परिसरात नामांकित स्पामध्ये सुरू होता वेश्याव्यवसाय
पुणे: पुण्यातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खराडी परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
येथील एका नामांकित स्पामध्ये सुरू असलेल्या हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या या काळ्या धंद्यावर पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका महिलेची सुटका केली आहे, तर मॅनेजरसह जागा मालकावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी पथकासह स्पावर टाकला अचानक छापा
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, खराडी परिसरातील ‘फील टच स्पा’ मध्ये मसाजच्या नावाखाली बेकायदेशीरपणे वेश्याव्यवसाय चालवला जात होता.
या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी सर्वप्रथम एक बनावट ग्राहक (डिकॉय कस्टमर) त्या स्पामध्ये पाठवला.
तिथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्री पटताच, पोलिसांनी दबा धरून बसलेल्या पथकासह अचानक स्पावर छापा टाकला.
स्पा च्या महिला मॅनेजरला केली अटक
या धडक कारवाईदरम्यान पोलिसांनी स्पाची मॅनेजर राधिका हरिप्रसाद शर्मा (वय ३८) हिला ताब्यात घेतले आहे.
तसेच, पैशांचे आमिष दाखवून या दलदलीत ओढण्यात आलेल्या नागालँड येथील एका २६ वर्षीय तरुणीची पोलिसांनी यशस्वी सुटका केली.
तिची सुटका करून तिला सुरक्षित स्थळी (सुधारणा गृहात) पाठवण्यात आले आहे.
या प्रकरणात केवळ स्पा चालवणाऱ्यांवरच नाही, तर या बेकायदेशीर कृत्यासाठी आपली जागा उपलब्ध करून देणाऱ्या मनीषा विद्यानंद शिंदे (वय ५४) या महिलेलाही पोलिसांनी आरोपी केले आहे.
पुण्यासारख्या मेट्रो शहरात स्पा आणि मसाज सेंटरच्या नावाखाली असे अवैध धंदे चालण्याचे प्रमाण वाढत असल्याने पोलिसांकडून आता कठोर पावले उचलली जात आहेत.
अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार (ITPA) या दोन्ही महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या रॅकेटचे धागेदोरे आणखी कुठे पसरले आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत.
नागरिकांनीही आपल्या परिसरात अशा संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.








