सिंहगडरोड पोलिसांनी रेकॉर्डवरील दोन आरोपी आणि एका विधीसंघर्षित बालकाकडून तीन गावठी पिस्तूल व चार जिवंत काडतुसे जप्त केली.
पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांनी केली कारवाई
पुणे : सिंहगडरोड पोलिसांनी गुन्हे प्रतिबंधात्मक कारवाईदरम्यान रेकॉर्डवरील दोन आरोपी आणि एका विधीसंघर्षित बालकाकडून तीन गावठी पिस्तूल व चार जिवंत काडतुसे जप्त केली.
तपास पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर आणि पोलीस अंमलदार सिंहगडरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करीत होते. पोलीस अंमलदार विनायक मोहिते आणि सागर शेडगे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सिंहगडरोड पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील ओळखीचे आरोपी ओमकार पांढरे आणि सुरज उर्फ चिक्या गायकवाड हे दोन गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे घेऊन वडगाव पठार येथील रेणुकामाता मंदिरासमोरील मोकळ्या जागेत थांबले आहेत.
ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली असता ओमकार पांढरे आणि सुरज उर्फ चिक्या गायकवाड हे तेथे आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पंचांसमक्ष अंगझडती घेतली.
झडतीदरम्यान ओमकार उर्फ दादया अशोक पांढरे (वय १८, रा. दत्तमंदिराजवळ, सिंहगड कॅम्पस, वडगाव बु., पुणे) याच्याकडून सुमारे ४० हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस, तर सुरज उर्फ चिक्या संतोष गायकवाड (वय १८, रा. जाधवनगर, वडगाव बु., पुणे) याच्याकडून ४० हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.
या प्रकरणी तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण कुलकर्णी करीत आहेत.
दरम्यान, दि. १९ ऑगस्ट रोजी पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर आणि पोलीस अंमलदार सिंहगडरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, विधीसंघर्षित बालक जाधव प्रवेशद्वाराच्या आतील वॉकिंग ट्रॅकवर, वडगाव बु. येथे अग्निशस्त्र घेऊन थांबले आहे.
माहितीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
तेथे संबंधित विधीसंघर्षित बालक आढळून आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडून सुमारे ४० हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे, अशी एकूण तीन पिस्तूल व चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.









