Girna Dam : महिनाभरानंतर गिरणा धरण चे सर्व दरवाजे बंद; 99.10 टक्के उपयुक्त जलसाठा


उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण असलेल्या गिरणा धरणाचे सर्व दरवाजे अखेर महिनाभरानंतर पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत.

गिरणा धरण नदीकाठच्या गावांसह शेतकऱ्यांनी सोडला सुटकेचा निश्वास

नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरणा धरणा चे सर्व दरवाजे अखेर महिनाभरानंतर पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत.

जुलै अखेरीस सुरू करण्यात आलेला पाण्याचा विसर्ग आता थांबविण्यात आल्याने नदीकाठच्या गावांसह शेतकऱ्यांनीही सुटकेचा निश्वास सोडला आहे.

सध्या धरणाची पाणीपातळी 398 मीटरवर पोहोचली असून, तब्बल 99.10 टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे.

यंदाच्या पावसाळ्यात पाणलोट क्षेत्रात जुलैअखेरीस जोरदार पाऊस झाला. त्यामुळे गिरणा धरणाच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ झाली.

आवक वाढल्याने सर्व दरवाजे 120 सेंमीपर्यंत उघडले

यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच 31 जुलै रोजी धरणाचे दरवाजे 30 सेंमीने उघडण्यात आले. मात्र, कसमादे परिसरात पावसाचा जोर कायम राहिल्याने धरणात होणारी पाण्याची आवक वाढत गेली.

परिस्थिती लक्षात घेऊन काही तासांतच विसर्ग वाढविण्यात आला. दुपारी चार वाजता सहाही वक्राकार दरवाजे 30 सेंमीने उघडण्यात आले.

त्यानंतर सायंकाळी पाच वाजता दरवाजे 60 सेंमीने, तर रात्री आठ वाजता 90 सेंमीने उचलण्यात आले. पाण्याची आवक आणखी वाढल्याने रात्री अकराच्या सुमारास सर्व दरवाजे 120 सेंमीपर्यंत उघडण्यात आले.

2 ऑगस्टला 50 हजार क्यूसेकने विसर्ग

धरणातील पाणीपातळी 20 टक्क्यांच्या पुढे गेल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी 1 ऑगस्टच्या पहाटे सर्व सहा दरवाजे 150 सेंमीने, तर 2ऑगस्टच्या पहाटे 180 सेंमीने उघडण्यात आले.

त्यावेळी गिरणा नदीपात्रात तब्बल 50 हजार क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील नदीकाठच्या भागात पूरस्थिती निर्माण झाली होती.

टप्प्याटप्प्याने विसर्ग कमी

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पावसाने काहीशी उघडीप दिल्यानंतर धरणातून होणारा विसर्ग टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आला. 5 ऑगस्ट रोजी दरवाजे 30 सेंमीपर्यंत खाली आणण्यात आले.

त्यानंतर 6 ऑगस्टला सहापैकी चार दरवाजे पूर्णपणे बंद करण्यात आले आणि केवळ दोन दरवाजांमधून विसर्ग सुरू ठेवण्यात आला.

यानंतर 22 ते 26 ऑगस्टदरम्यान केवळ एकच दरवाजा उघडा ठेवण्यात आला होता.

मात्र, पावसाचा जोर कमी झाल्याने तसेच नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह पूर्ववत झाल्याने विसर्गाची आवश्यकता उरली नाही.

अखेर 29 ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास उर्वरित दरवाजाही पूर्णपणे बंद करण्यात आले. त्यामुळे तब्बल महिनाभर सुरू असलेला गिरणा धरणाचा पाण्याचा विसर्ग अखेर थांबला आहे.

सध्या धरणात 99.10 टक्के उपयुक्त जलसाठा असल्याने आगामी काळात उत्तर महाराष्ट्रातील शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे.


4
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!