Chalisgaon Accident News | कन्नड घाटात एसटी बसचा भीषण अपघात; ५९ प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला


कन्नड घाटात एसटी बसचा भीषण अपघात; ५९ प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला असल्याची घटना आज घडली आहे.

कन्नड घाटात कठड्यावर अडकल्याने मोठा अनर्थ टळला

चाळीसगाव पासून जवळ असलेल्या कन्नड घाटात छत्रपती संभाजीनगरहून सुरतकडे जाणाऱ्या एसटी बसचा रविवारी दुपारी भीषण अपघात झाला.

स्टीअरिंग रॉड तुटल्याने किंवा स्टीअरिंग जॅम झाल्याने चालकाचे अचानक बसवरील नियंत्रण सुटल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर अवघ्या काही क्षणांत बस घाटातील संरक्षक कठड्यावर जाऊन आदळली.

बसची संरक्षक कठड्याला जोरदार धडक बसल्यानंतर ती कठड्यावरच अडकून राहिली. त्यामुळे बस थेट दरीत कोसळण्याचा मोठा धोका टळला.

अन्यथा या अपघाताची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता होती. अपघाताच्या वेळी बसमध्ये तब्बल ५९ प्रवासी असल्याने घटनास्थळी काही काळ मोठी घबराट निर्माण झाली.

 

प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

बस अचानक नियंत्रणाबाहेर गेल्याने प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. काही क्षणांत बस संरक्षक कठड्यावर धडकल्याने प्रवाशांना मोठा धक्का बसला. बस दरीत कोसळण्यापासून वाचल्याचे लक्षात आल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

अपघाताच्या कारणाचा तपास सुरू

या घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बसमधील प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले.

स्टीअरिंग रॉड तुटला होता की स्टीअरिंगमध्ये तांत्रिक बिघाड झाला, याबाबत तपास केला जात आहे.

कन्नड घाटातील धोकादायक वळणे आणि तीव्र उतार लक्षात घेता, वाहनांच्या तांत्रिक स्थितीची नियमित तपासणी आणि घाटमार्गावर सुरक्षिततेच्या उपाययोजना किती महत्त्वाच्या आहेत, हे या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे.


4
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!