अभिजीत दिपके यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा; शाळेत अनधिकृत प्रवेश करून चित्रीकरण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अभिजीत दिपके यांनी धमकी दिल्याचा आरोप
औसा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, प्रशाला विभाग उर्दू, औसा येथे अनधिकृतपणे प्रवेश करून विद्यार्थ्यांमध्ये बसून चित्रीकरण केल्याप्रकरणी कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांच्यासह अजिंक्य शिंदे आणि अन्य चार ते पाच अनोळखी व्यक्तींविरुद्ध औसा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्षकांच्या शैक्षणिक व शासकीय कामात अडथळा आणणे, परवानगीशिवाय चित्रीकरण करणे, शिक्षकांना अपशब्द वापरणे तसेच निलंबित करण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांमध्ये बसून विचारले प्रश्न
फिर्यादीनुसार, २० ऑगस्ट रोजी दुपारी सव्वा एकच्या सुमारास अभिजीत दिपके हे काही सहकाऱ्यांसह शाळेत गेले.
त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये बसून विविध प्रश्न विचारले. त्यामुळे शिक्षकांच्या शैक्षणिक व शासकीय कामात अडथळा निर्माण झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
शाळेची पूर्वपरवानगी न घेता या संपूर्ण प्रकाराचे चित्रीकरण करण्यात आले आणि ते सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आल्याचाही आरोप आहे.
यावेळी शिक्षकांना अपशब्द वापरण्यात आले तसेच त्यांना निलंबित करण्याची धमकी देण्यात आल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
शिक्षिकेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल
या प्रकरणी शाळेतील शिक्षिका सय्यद समशादबानो खैरातअली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून औसा पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४८८/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील कलम १३२, ३२९(३), ३५१(२), ३५६(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
‘स्कूल ठीक करो’ अभियानातून उपस्थित केले प्रश्न
दरम्यान, ‘स्कूल ठीक करो’ अभियानांतर्गत पाहणी करताना जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात खासगी शाळेतील विद्यार्थी आढळल्याचा दावा अभिजीत दिपके यांनी केला होता. विद्यार्थ्यांसमोर विचारणा केली असता संबंधित विद्यार्थ्यांनी आपण खासगी शाळेत शिक्षण घेत असल्याचे सांगितल्याचा दावा त्यांनी केला.
त्यामुळे जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात खासगी शाळेतील विद्यार्थी नेमके कशासाठी आणि कोणाच्या परवानगीने उपस्थित होते, असा सवाल दिपके यांनी उपस्थित केला होता. या पाहणीचे चित्रीकरण सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर आता त्यांच्यासह अन्य व्यक्तींवर गुन्हा दाखल झाल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक आर. के. डमाळे यांच्या आदेशाने पोलिस उपनिरीक्षक महेश गायकवाड करीत आहेत.
शाळेत प्रवेश करण्याची परिस्थिती, करण्यात आलेले चित्रीकरण, सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेला मजकूर तसेच संबंधित व्यक्तींची भूमिका याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.
‘गुन्हे दाखल झाले तरी आम्ही घाबरणार नाही’
याबाबत सीजेपीचे अजिंक्य शिंदे यांनी सांगितले की, औसा येथील शाळेत अनेक अनधिकृत गोष्टी होत असल्याचा त्यांचा आरोप आहे.
शाळेच्या आवारात दारू, गांजा सेवन, स्वच्छतागृहाचा अभाव यासह अनेक समस्या असल्याचे त्यांनी म्हटले.
ग्रामीण भागातील शाळांमध्ये सुधारणा झाली पाहिजे आणि त्यासाठी आणखी गुन्हे दाखल झाले तरी आपण घाबरणार नसल्याचे शिंदे यांनी सांगितले.









