यावल तालुक्यातील डांभुर्णी गावातील गोळीबार ची धक्कादायक घटना; देशी पिस्तुल, मॅगझिन आणि जिवंत काडतूस जप्त
गोळीबार च्या घटनेने परिसरात एकच खळबळ
जळगाव : गावात रात्रीची शांतता असताना अचानक गोळीबाराचा आवाज घुमला आणि परिसरात एकच खळबळ उडाली.
विशेष म्हणजे, हा गोळीबार गावच्या विद्यमान सरपंचाने केल्याचा आरोप समोर आल्याने डांभुर्णी गावात चर्चेला उधाण आले आहे.
ही घटना २७ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ८ वाजता यावल तालुक्यातील डांभुर्णी येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डांभुर्णी येथील सरपंच विकास उर्फ गोटू जगन्नाथ सोळंके गोडू याने गावातील एका ठिकाणी येऊन देशी पिस्तुलातून हवेत गोळीबार केल्याचा आरोप आहे.
घटनेची माहिती मिळताच यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
जिवंत काढतोस आणि गोळीबार ची पुंगळी मिळाली
घटनास्थळाची पाहणी केली असता, शिवमार्ट सोयाबीन बिर्याणीच्या दुकानाजवळ एक न फुटलेले जिवंत काडतूस आणि गोळीबार करण्यात आलेल्या राऊंडची रिकामी पुंगळी पोलिसांना आढळून आली.
पोलिसांनी परिसरातील दुकानांमध्ये चौकशी करून घटनेबाबत माहिती घेतली.
तसेच मोबाईल फोरेन्सिक व्हॅनच्या मदतीने घटनास्थळाची पाहणी करून महत्त्वाचे भौतिक पुरावे संकलित करण्यात आले.
गोळीबारानंतर आरोपी पसार
गोळीबार केल्यानंतर संशयित आरोपी घटनास्थळावरून निघून गेल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
तो जळगावच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन, पोलीस शिपाई सचिन पाटील यांच्यासह पोलिसांचे पथक त्याच्या शोधासाठी रवाना झाले.
त्याचवेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही स्वतंत्रपणे शोधमोहीम सुरू केली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांची शोधमोहीम सुरू होती.
अखेर रात्री सुमारे १ वाजता जळगाव शहरातील कालंका माता मंदिर परिसरातून विकास उर्फ गोटू सोळंके याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
हॉटेलमधील वादातून गोळीबार?
पोलिसांच्या चौकशीत या गोळीबारामागील कथित कारण समोर आल्याचे सांगण्यात आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, संशयित आरोपीचे डांभुर्णी गावात आदर्श हॉटेल, बिअर बार आणि परमिट रूम आहे.
काही मुले त्याच्या हॉटेल व बिअर बारमध्ये येऊन मोबाईलवर व्हिडीओ काढत असल्याने त्यांना विरोध होता, असा आरोप आहे.
२६ ऑगस्ट रोजी झालेल्या एका वादामुळे संशयित आरोपीच्या मनात या मुलांविषयी संताप निर्माण झाला होता.
त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे २७ ऑगस्टच्या रात्री त्याने धाक निर्माण करण्याच्या उद्देशाने देशी पिस्तुलातून हवेत गोळीबार केल्याचे चौकशीत सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
शेतात लपवले पिस्तुल
गोळीबार केल्यानंतर वापरलेले शस्त्र आरोपीने स्वतःजवळ ठेवले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांच्या माहितीनुसार, गोळीबारासाठी वापरलेले देशी पिस्तुल आणि एक जिवंत राऊंड डांभुर्णी गावाच्या शिवारातील एका हॉटेलजवळील शेतात लपवून ठेवल्याची माहिती संशयित आरोपीने दिली.
त्यानंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी जाऊन शोध घेतला असता देशी पिस्तुल, मॅगझिन आणि एक जिवंत राऊंड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गवित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
दरम्यान, गोळीबार करण्यासाठी देशी पिस्तुल आरोपीकडे कुठून आले, या घटनेमागे नेमका वाद काय होता आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास आता पोलीस करीत आहेत.
(बातमीत वापरलेला फोटो AI ने तयार करून दिलेला आहे.)









