१५ वर्षीय वैभव सूर्यवंशी ने स्वतःच्या नावावर आणखी एका ऐतिहासिक जागतिक विक्रमाची नोंद केली आहे.
वैभव सूर्यवंशी च्या नावावर ऐतिहासिक जागतिक विक्रमाची नोंद
नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटचा ‘वंडरकिड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने स्वतःच्या नावावर आणखी एका ऐतिहासिक जागतिक विक्रमाची नोंद केली आहे.
जगभरात विविध क्षेत्रांत आपल्या कामगिरीने भविष्य घडवणाऱ्या उदयोन्मुख ताऱ्यांचा गौरव करणाऱ्या प्रतिष्ठित अमेरिकन ‘टाइम’ (TIME) मॅगझिनच्या ‘TIME 100 Next २०२६’ यादीत वैभवने स्थान पटकावले आहे.
विशेष म्हणजे, या संपूर्ण वैश्विक यादीत स्थान मिळवणारा तो जगातील सर्वात तरुण व्यक्ती ठरला आहे.
या वर्षीच्या यादीत जगभरातील क्रीडा क्षेत्रातून केवळ ७ खेळाडूंची निवड करण्यात आली असून, त्यात स्थान मिळवणारा वैभव हा एकमेव भारतीय आणि एकमेव क्रिकेटपटू आहे.
टाईम मॅगझिनने त्याचा समावेश ‘फेनॉम’ (Phenom) श्रेणीत केला आहे.
या यादीत अमेरिकन फुटबॉलपटू आर्च मॅनिंग आणि NBA स्टार टायरीस मॅक्सी यांसारख्या जागतिक दिग्गजांचा समावेश आहे.
चित्रपटपटालाही लाजवेल असा प्रवास
बिहारच्या एका छोट्या गावातून आलेल्या वैभवचा प्रवास थक्क करणारा आहे. वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी त्याने रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले होते.
२०२४ च्या आयपीएल (IPL) लिलावात राजस्थान रॉयल्सने त्याला १ कोटी रुपयांना संघात सामील करून घेतले, ज्यामुळे तो आयपीएल इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू ठरला.
आयपीएल २०२५ मध्ये त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध अवघ्या ३५ चेंडूंत शतक ठोकून पुरुष टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात शतक झळकावण्याचा जागतिक विक्रम केला.
तर आयपीएल २०२६ च्या हंगामात १६ सामन्यांत ७७६ धावा आणि ७२ षटकार कुटून तो खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला.
सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत
वैभवची घोडदौड एवढ्यावरच थांबली नाही. जुलै २०२६ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत पदार्पण करत तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा भारताचा सर्वात तरुण पुरुष खेळाडू बनला.
यासह त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा अनेक वर्षांचा विक्रम मोडला.
याशिवाय, त्याने भारताला अंडर-१९ विश्वचषक २०२६ चे विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती.
सध्या तो एशियन गेम्ससाठी निवडलेल्या भारतीय संघातही सर्वात तरुण खेळाडू म्हणून प्रतिनिधित्व करत आहे.
अवघ्या १५ व्या वर्षी त्याने मैदानावरील विक्रमांसह जागतिक स्तरावर भारताची मान अभिमानाने उंचावली आहे.









