Pune University News : पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहातील मेसवर FDA ची मोठी कारवाई; अस्वच्छता आणि अन्नात किडे आढळल्याने परवाना निलंबित


पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या वस्तीगृहातील मेस मधील अनाथ किडे आढळल्याने कारवाई करण्यात आली आहे.

पुणे विद्यापीठाच्या मेसवर FDA ची मोठी कारवाई

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहातील मेसमध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मेसमधील भयानक अस्वच्छता आणि निकृष्ट दर्जाच्या अन्नामुळे अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे.

अन्नसुरक्षेच्या नियमांचे सरळ-सरळ उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्याने या मेसचा परवाना तातडीने निलंबित करण्यात आला असून, मेस पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

विद्यापीठाची निष्काळजी, अखेर ‘एफडीए’ची धाड

वसतिगृहातील विद्यार्थिनींनी यापूर्वी जेवणाच्या दर्जाबाबत विद्यापीठ प्रशासनाकडे वारंवार लेखी आणि तोंडी तक्रारी केल्या होत्या. मात्र, प्रशासनाने यावर कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही.

विद्यापीठ प्रशासनाकडून दाद न मिळाल्याने अखेर त्रस्त विद्यार्थिनींनी अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) धाव घेतली.

विद्यार्थिनींच्या तक्रारीची दखल घेत ‘एफडीए’चे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार अधिकाऱ्यांनी मेसवर अचानक धाड टाकली.

तपासणीत धक्कादायक बाबी उघड

‘एफडीए’च्या तपासणी दरम्यान मेसमध्ये अक्षम्य निष्काळजीपणा आणि भयानक परिस्थिती उघडकीस आली.

तपासणी अहवालानुसार, मेसच्या स्वयंपाकघरात (किचन) जिवंत झुरळे, किडे आणि त्यांची अंडी मोठ्या प्रमाणावर आढळली.

कचऱ्याचे डबे उघडे टाकण्यात आले होते, तर अन्न बनवणारे कामगार कोणतेही हँडग्लोव्हज किंवा सुरक्षा नियम न पाळता काम करत होते.

सर्वात गंभीर बाब म्हणजे, शाकाहारी आणि मांसाहारी जेवण बनवण्यासाठी स्वतंत्र जागा किंवा भांडी देखील वापरली जात नव्हती.

पाण्याच्या गुणवत्तेपासून ते अन्नसुरक्षेपर्यंत सर्वच बाबतीत नियमांना हरताळ फासल्याचे समोर आले.

अन्नात सापडल्या होत्या सेफ्टी पिन आणि धातूच्या तारा

विद्यार्थिनींच्या तक्रारीनुसार, त्यांना मिळणाऱ्या जेवणात आणि नाश्त्यामध्ये अनेकदा आळ्या, झुरळे, भाज्यांमध्ये प्लास्टिक, धातूची तार, सेफ्टी पिन आणि केस आढळले होते. रोजच्या अशा निकृष्ट जेवणामुळे विद्यार्थिनींच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.

कंत्राटदाराचा परवाना रद्द; कारवाईची तयारी

ही मेस ‘मे. मराठा केटरर्स’ (चालक – आकाश मोहिते) यांच्यामार्फत चालवली जात होती.

या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने कडक पाऊल उचलत कंत्राटदाराचा परवाना तात्काळ निलंबित केला आहे.

तसेच नियम धाब्यावर बसवून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे ‘एफडीए’ प्रशासनाने स्पष्ट केले आहे. विद्यापीठ आवारातील या कारवाईमुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!