Pune Police News | पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाला मिळाली स्वतंत्र जागा, मुख्यालय उभारणीचा मार्ग मोकळा


तब्बल आठ वर्षांनी पोलिसांना स्वतंत्र आणि हक्काची जागा मिळाली आहे. येथे स्वतंत्र पोलीस मुख्यालय उभारले जाणार आहे.

पोलिस आयुक्तालयाच्या स्थापनेनंतर आठ वर्षांनी मिळाली हक्काची जागा

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या स्थापनेनंतर तब्बल आठ वर्षांनी पोलिसांना स्वतंत्र आणि हक्काची जागा मिळाली आहे.

ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाच्या वळुमाता प्रक्षेत्रातील तब्बल 20 हेक्टर अर्थात सुमारे 50 एकर जमीन मुख्यालयासाठी शुक्रवारी (13 ऑगस्ट 2026) पोलिस प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आली.

त्यामुळे स्वतंत्र पोलिसमुख्यालय, परेड मैदान आणि अत्याधुनिक सुविधांच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

दिनांक 28 मे 2018 रोजीच्या शासन निर्णयानुसार पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाची स्थापना झाली. 15 ऑगस्ट 2018 पासून प्रत्यक्ष कामकाज सुरू झाले.

मात्र, स्वतंत्र जागेअभावी निगडी येथील महापालिकेच्या बोऱ्हाडे शाळेतील जागेत भाडेतत्त्वावर मुख्यालयाचे कामकाज सुरू होते.

अपुऱ्या जागेमुळे प्रशासकीय कामकाजासह विविध विभागांच्या व्यवस्थापनावरही मर्यादा येत होत्या.

आयुक्त चौबे यांनी घेतला पुढाकार

पोलिसआयुक्त विनय कुमार चौबे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यालयासाठी स्वतंत्र जागेचा प्रश्न प्राधान्याने हाती घेतला.

ताथवडे येथील जागा प्रशासकीय आणि दळणवळणाच्या दृष्टीने योग्य असल्याने शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.

महसूल व वन विभागाच्या मंजुरीनंतर पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने १३ ऑगस्ट रोजी ही जमीन  प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आली.

पायाभूत सुविधांना आता नवी दिशा

प्रक्रियेसाठी आयुक्त विनयकुमार चौबे, पोलिस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपरआयुक्त सारंग आवाड, डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त गणेश इंगळे आणि पोलिस निरीक्षक विकास राऊत यांनी पाठपुरावा केला.

आठ वर्षांची प्रतीक्षा संपल्याने पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या पायाभूत सुविधांना आता नवी दिशा मिळणार आहे.

काय होणार जागेवर?

विस्तीर्ण जागेत उपआयुक्त (मुख्यालय) कार्यालय, शस्त्रागार, क्यूआरटी, बीडीडीएस, मोटार परिवहन विभाग, परेड ग्राऊंड, पोलिस भरती मैदान, रनिंग ट्रॅक, क्रीडांगणे, इंटरनल शूटिंग रेंज आणि श्वान पथक उभारण्यात येणार आहे.

तसेच पोलिस दवाखाना, पाल्यांसाठी शाळा, बहुद्देशीय सभागृह आणि अधिकारी-अंमलदारांसाठी निवास व्यवस्था उभारण्याचे नियोजन आहे.


4
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!