पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या मार्गावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. नाशिकरोड-शिर्डी-पुणतांबा-अहिल्यानगर या नव्या मार्गाला अधिकृत मंजुरी दिली आहे.
पुणे-नाशिक नव्या मार्गाला अधिकृत मंजुरी
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या मार्गावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे.
मूळ नियोजित सिन्नर-संगमनेर-नारायणगाव-चाकण या सरळ मार्गाऐवजी केंद्र सरकारने आता नाशिकरोड-शिर्डी-पुणतांबा-अहिल्यानगर या नव्या मार्गाला अधिकृत मंजुरी दिली आहे.
केंद्राने या संदर्भात राजपत्र अधिसूचना जारी केली असून, नाशिकरोड ते शिर्डी या ९५.५ किमी अंतराच्या रेल्वे मार्गासाठी प्रत्यक्षात भूसंपादनाची प्रक्रिया देखील सुरू केली आहे.
सुधारित आराखड्यानुसार, हा रेल्वेमार्ग आता नाशिक, सिन्नर, शिर्डी, पुणतांबा आणि अहिल्यानगर (अहमदनगर) असा पुढे जाणार आहे.
मार्ग बदलण्याचे कारण आणि वाद
नारायणगाव येथील ‘जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप’ (GMRT) प्रकल्पाच्या ‘रेडिओ-शांतता क्षेत्राच्या’ (Radio-Quiet Zone) सुरक्षेचा तांत्रिक मुद्दा पुढे करत रेल्वेचा मूळ मार्ग बदलण्यात आला आहे.
रेल्वेच्या लहरींमुळे या अंतराळ संशोधन प्रकल्पाला अडथळा येऊ नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आला.
मात्र, नव्या मार्गासाठी भूसंपादन सुरू होताच, जुन्या आणि सरळ मार्गासाठी स्थानिक नागरिक तसेच लोकप्रतिनिधींकडून जोरदार मागणी सुरू झाली आहे.
मूळ मार्ग बदलल्याने चाकण, संगमनेरसारख्या औद्योगिक आणि व्यापारी पट्ट्यांच्या विकासाला मोठा फटका बसेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
काकोडकर समितीच्या अहवालाआधीच निर्णय?
विशेष म्हणजे, मूळ आणि नव्या मार्गाचा सविस्तर तांत्रिक अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमली आहे.
या समितीचा अधिकृत अहवाल अद्याप येणे बाकी आहे. असे असतानाच केंद्र सरकारने नव्या मार्गाला मंजुरी देऊन थेट काम सुरू केल्याने राज्य सरकारच्या समितीच्या प्रासंगिकतेवर आणि केंद्राच्या या घाईघाईने घेतलेल्या निर्णयावर आता राजकीय व सामाजिक स्तरावरून मोठे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
तथापि, या मार्गाच्या अंमलबजावणीमुळे शिर्डी या प्रसिद्ध तीर्थक्षेत्राला थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.









