नात्यांमध्ये रक्ताच्या नात्यापेक्षाही माणुसकी आणि प्रेम मोठे असते, याचा प्रत्यय देणारी हृदयस्पर्शी घटना जळगाव जिल्ह्यात समोर आली आहे. दोन्ही किडन्या निकामी झाल्याने जावयासाठी सासूने स्वतःची किडनी दान केली.
जावयाच्या दोन्ही किडनी होत्या निकामी
जळगाव : नात्यांमध्ये रक्ताच्या नात्यापेक्षाही माणुसकी आणि प्रेम मोठे असते, याचा प्रत्यय देणारी हृदयस्पर्शी घटना जळगाव जिल्ह्यात समोर आली आहे.
दोन्ही किडन्या निकामी झाल्याने डायलिसिसवर असलेल्या आपल्या जावयासाठी सासूने स्वतःची किडनी दान केली. एका किडनीवर आपण सुखाने जगू शकतो, या विश्वासाने त्यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे जावयाला नवजीवन मिळाले आहे.
नियमितपणे डायलिसिसची प्रक्रिया
अमळनेर येथील रहिवासी सेवानिवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील आणि त्यांच्या पत्नी सुशीलाबाई पाटील यांच्या कन्या कविता यांचा विवाह म्हसावद येथील ॲड. अतुल रमेश चव्हाण यांच्याशी झाला आहे.
कविता चव्हाण या नाशिक ग्राहक न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत, तर ॲड. अतुल चव्हाण हे एका नामांकित कंपनीत कायदेशीर सल्लागार म्हणून काम करतात.
दरम्यान, सुमारे दोन वर्षांपूर्वी ॲड. अतुल चव्हाण यांना आजाराने ग्रासले.
वैद्यकीय तपासणीनंतर त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांच्यावर नियमितपणे डायलिसिसची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
मात्र, डायलिसिसमुळे त्यांना मोठ्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत होते.
किडनी प्रत्यारोपणाशिवाय कायमस्वरूपी पर्याय नसल्याने दोन्ही कुटुंबीय चिंतेत होते.
किडनी दाता मिळणे आणि त्यानंतर किडनीची योग्य जुळवणी होणे, हे मोठे आव्हान होते.
त्यामुळे कुटुंबीयांमध्ये चिंता वाढली होती. अशा कठीण परिस्थितीत सुशीलाबाईंनी पुढाकार घेतला.
स्वतःची किडनी दान करण्याचा निर्णय
‘माणूस एका किडनीवरही निरोगी आयुष्य जगू शकतो. माझी एक किडनी जावयाला दिल्याने त्याचे प्राण वाचणार असतील आणि माझ्या मुलीचे संसारिक आयुष्य सुखी होणार असेल, तर यापेक्षा मोठे समाधान कोणते?’ या भावनेतून त्यांनी स्वतःची किडनी दान करण्याचा निर्णय घेतला.
वैद्यकीय तपासण्या आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सुशीलाबाईंची किडनी ॲड. अतुल चव्हाण यांच्यासाठी योग्य ठरली. त्यानंतर प्रत्यारोपणाची प्रक्रिया करण्यात आली.
सासूने जावयासाठी घेतलेल्या या धाडसी निर्णयामुळे अतुल चव्हाण यांना नवजीवन मिळाले.
सुशीलाबाईंच्या या निर्णयातून केवळ एका जावयाला जीवनदान मिळाले नाही, तर नात्यांमधील प्रेम, विश्वास आणि माणुसकीचे अनोखे उदाहरणही समाजासमोर आले आहे.
संकटाच्या काळात रक्ताच्या नात्यांपलीकडे जाऊन एका आईने आपल्या मुलीच्या संसारासाठी घेतलेला हा निर्णय सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.









