पुणे मेट्रोने बाजी मारली असून, अवघ्या एका आठवड्यात मेट्रोने तब्बल २५ लाख प्रवाशांना सेवा देत एक नवा ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे.
पुणे मेट्रोने २५ लाख प्रवाशांना सेवा देत केला नवा ऐतिहासिक विक्रम
पुणे: गणेशोत्सव काळात रस्त्यांवरील अभूतपूर्व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी आणि बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी सार्वजनिक वाहतुकीला प्रचंड पसंती दिली आहे.
यात पुणे मेट्रोने बाजी मारली असून, अवघ्या एका आठवड्यात मेट्रोने तब्बल २५ लाख प्रवाशांना सेवा देत एक नवा ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे.
या अभूतपूर्व प्रतिसादामुळे महामेट्रोच्या तिजोरीत ३.७९ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला असून, पुणे मेट्रोच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाहतूक आणि कमाई ठरली आहे.
रस्त्यांवरील वाहतूक कोंडीला मेट्रोचाच पर्याय
उत्सवाच्या काळात मध्यवर्ती भागातील मानाचे गणपती आणि विविध मंडळांचे भव्य देखावे पाहण्यासाठी पुणेकरांसह राज्याच्या कानाकोपऱ्यांतून भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
रस्त्यांवर वाहने आणण्याऐवजी आणि ट्रॅफिक जाममध्ये अडकण्याऐवजी नागरिकांनी ‘महामेट्रो’ने प्रवास करण्याचा स्मार्ट पर्याय निवडला.
विशेषतः शनिवार आणि रविवारी वीकेंडला गर्दीचा उच्चांक पाहायला मिळाला, जेव्हा अवघ्या दोन दिवसांत ८.७७ लाखांहून अधिक लोकांनी मेट्रोचा वापर केला. शनिवार एकाच दिवशी विक्रमी ४.७८ लाख प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला.
मेट्रो प्रशासनाचे चोख नियोजन आणि ५ मिनिटांची फ्रिक्वेन्सी
गर्दीचे अचूक व्यवस्थापन करण्यासाठी मेट्रो प्रशासनाने फेऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवली होती.
गर्दीच्या वेळी दर ५ मिनिटांच्या अंतराने मेट्रो ट्रेन धावत होत्या. भाविकांच्या सोयीसाठी मेट्रो सेवा रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यात आली होती.
प्रवाशांना तिकीट काढताना त्रास होऊ नये म्हणून स्थानकांवर अतिरिक्त तिकीट खिडक्या, डिजिटल काउंटर आणि क्यूआर कोड तिकीट प्रणाली सक्षम करण्यात आली होती.
‘या’ स्थानकांवर झाली सर्वाधिक गर्दी
पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट (पर्पल लाईन) आणि वनाझ ते रामवाडी (ॲक्वा लाईन) या दोन्ही मार्गांना प्रवाशांनी डोक्यावर घेतले.
यामध्ये ‘पर्पल लाईन’चा वाटा एकूण प्रवासी संख्येत ५४ टक्के आणि कमाईमध्ये ५८ टक्के इतका राहिला.
मध्यवर्ती भागातील महात्मा फुले मंडई, कसबा पेठ, जिल्हा न्यायालय (इंटरचेंज स्टेशन) आणि स्वारगेट या मेट्रो स्थानकांवर प्रवाशांची सर्वाधिक अलोट गर्दी पाहायला मिळाली.
पुणे मेट्रोने या गणेशोत्सवात दाखवून दिले आहे की, वेगवान, सुरक्षित आणि गारेगार सेवा मिळाल्यास पुणेकर वैयक्तिक वाहने बाजूला ठेवून सार्वजनिक वाहतुकीलाच पहिली पसंती देतात.









