पुणे शहर आणि परिसरात केलेल्या एका धडक कारवाईत प्रशासनाने तब्बल १ कोटी १८ लाख रुपयांचा भेसळयुक्त खवा आणि निकृष्ट मिठाईचा साठा जप्त केला आहे.
पुण्यात १ कोटी १८ लाखांचा भेसळयुक्त खवा जप्त
पुणे: सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळमाफियांना पुणे अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठा दणका दिला आहे.
पुणे शहर आणि परिसरात केलेल्या एका धडक कारवाईत प्रशासनाने तब्बल १ कोटी १८ लाख रुपयांचा भेसळयुक्त खवा आणि निकृष्ट मिठाईचा साठा जप्त केला आहे.
याप्रकरणी बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या ६ जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या मोठ्या कारवाईमुळे पुणे आणि परिसरातील भेसळमाफियांचे धाबे दणाणले आहेत.
४ मोठ्या मिठाई उत्पादकांवर छापे
गणेशोत्सव आणि आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत खवा आणि मिठाईला मोठी मागणी असते.
याच संधीचा गैरफायदा घेऊन पुण्यात बाहेरील राज्यांतून आणि इतर जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त तसेच निकृष्ट दर्जाचा खवा आणला जात असल्याची गुप्त माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती.
या खात्रीशीर माहितीच्या आधारे एफडीएच्या पथकाने पुण्यातील चार मोठ्या मिठाई उत्पादन आस्थापनांवर (स्वीट मार्ट्स) अचानक छापे टाकले.
आरोग्याला घातक पदार्थ जप्त
या छाप्यात अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात मानवी आरोग्याला अत्यंत घातक असणारे रासायनिक पदार्थ, वनस्पती तूप आणि निकृष्ट दर्जाचा साठा आढळून आला.
हा सर्व भेसळयुक्त खवा आणि मिठाई सणांच्या काळात बाजारात विक्रीसाठी पाठवली जाणार होती.
एफडीएने तातडीने कारवाई करत १ कोटी १८ लाख रुपये किमतीचा हा सर्व साठा जप्त केला आणि नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू केली.
या प्रकरणी अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
सणासुदीच्या काळात मिठाई खरेदी करताना नागरिकांनी अधिक सतर्क राहावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.
ग्राहकांनी मिठाई केवळ अधिकृत आणि नोंदणीकृत दुकानातूनच खरेदी करावी. मिठाईचा रंग आणि चव यामध्ये काही संशयास्पद वाटल्यास तातडीने एफडीएकडे तक्रार नोंदवावी.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांची गय केली जाणार नाही आणि यापुढेही अशी धडक मोहीम सुरूच राहील, असा इशारा एफडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आहे.









