Pune Crime News | शिल्पा गवारे हुंडाबळी प्रकरणाला नवे वळण; फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन


शिल्पाच्या मृत्यू प्रकरणी त्यांच्या नणंद स्नेहा कलाटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संवाद साधला.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या फोनमुळे प्रकरण आला नवे वळण

पिंपरी-चिंचवड : राज्यभर गाजलेल्या पुण्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये शिल्पा गवारे यांच्या मृत्यूच्या घटनेने पुन्हा एकदा हुंडाबळी आणि विवाहितेच्या छळाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

शिल्पा गवारे यांचा हुंड्यासाठी छळ करून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांच्या माहेरच्या कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा गंभीर आरोपही कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.

शिल्पा गवारे या भाजपच्या नगरसेविका स्नेहा कलाटे यांच्या नणंद होत.

शिल्पाच्या मृत्यूनंतर कलाटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, तिच्या पश्चात दोन मुले आहेत.

तब्बल १७ वर्षांच्या संसाराचा अशा प्रकारे झालेला अंत कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांसाठीही मन हेलावून टाकणारा ठरला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संवाद

दरम्यान, शिल्पाच्या मृत्यू प्रकरणी त्यांच्या नणंद स्नेहा कलाटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संवाद साधला.

शिल्पावर झालेला कथित छळ आणि या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर भावनिक आवाहन करत, महिलांवरील अशा प्रकारचा छळ थांबवण्यासाठी कठोर पावले उचलण्याची विनंती त्यांनी केली.

यावेळी शिल्पा गवारे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

17 वर्षे छळ केल्याचा कुटुंबीयांचा आरोप

शिल्पाचा पती सचिन गवारे, सासरे उत्तम गवारे, सासू संजीवनी गवारे आणि दीर संदीप गवारे यांनी तब्बल १७ वर्षे तिचा छळ केल्याचा आरोप माहेरच्या कुटुंबीयांनी केला आहे.

दोन एकर जमीन, व्यवसायासाठी आर्थिक मदत तसेच वेळोवेळी लाखो रुपयांची रोकड देण्यात आली. मात्र, एवढे करूनही शिल्पाचा कथित छळ थांबला नाही, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

मुलगी सुखी राहावी या अपेक्षेने तिच्या माहेरच्या कुटुंबीयांनी वेळोवेळी सासरच्या मंडळींच्या मागण्या पूर्ण केल्याचे सांगितले जाते.

शिल्पाने माहेरी परत यावे, अशी विनंती तिच्या आई-वडिलांनी आणि भावांनी केल्याचेही कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

मात्र, संसार आणि कुटुंबाचा विचार करून शिल्पा सासरीच राहिली. अखेर तिच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाचा अंत झाला आणि तिने टोकाचे पाऊल उचलल्याचे प्रथमदर्शनी समोर आले.

मात्र, शिल्पाचा मृत्यू आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप तिच्या माहेरच्या कुटुंबीयांनी केला आहे.

आत्महत्या की हत्या? पोलिसांचा तपास सुरू

शिल्पा गवारे यांच्या मृत्यू प्रकरणाला आता वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.

वाकड पोलिसांनी या घटनेचा आत्महत्येसोबतच हत्येच्या दृष्टीनेही तपास सुरू केला आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, शिल्पाने गळफास घेतला त्यावेळी तिच्या बेडरूमचे दार उघडे होते.

ही घटना मध्यरात्री सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास घडल्याचे समोर आले आहे.

त्यावेळी पती सचिन घरात असताना तो बेडरूममध्ये का नव्हता, असा सवाल शिल्पाच्या कुटुंबीयांकडून उपस्थित करण्यात आला आहे.

या प्रकरणातील परिस्थितीजन्य बाबींचाही पोलिसांकडून तपास केला जात आहे.

वाकड पोलिस ठाण्यात हुंडाबळीचा गुन्हा

दरम्यान, पोलिस तपासात शिल्पाच्या पती सचिन गवारे याच्यावर लग्नापूर्वी हत्येचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आल्याने या प्रकरणात आणखी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पती सचिन, सासू संजीवनी, सासरे उत्तम आणि दीर संदीप यांना अटक करण्यात आली आहे. चौघांनाही न्यायालयाने ३१ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

आता शिल्पा गवारे यांचा मृत्यू नेमका आत्महत्या आहे की हत्या, तसेच त्यांच्या मृत्यूमागे हुंड्यासाठीचा छळ कितपत कारणीभूत आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

या प्रकरणातील तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेकडे शिल्पाच्या कुटुंबीयांसह पिंपरी-चिंचवडकरांचे लक्ष लागले आहे.


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!