पुण्यातील कोंढव्यात अंमली पदार्थ विरोधी दलाने छापा टाकून जप्त केला गांजा, वाहने आणि मोबाईल संच. तसेच 43 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
अंमली पदार्थ, 14 दुचाकी, तीनचाकी गाड्या, 35 मोबाइल संच जप्त
पुणे : अंमलीपदार्थ विरोधी कृती दलाने गुरुवारी पहाटे मोठी कारवाई केली. अंमली पदार्थांची विक्री करणार्या दोन सराईत गुन्हेगारांना पकडून त्यांच्याकडे अंमली पदार्थ विकत घेण्यासाठी आलेल्या 43 जणांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून 14 दुचाकी, तीनचाकी गाड्या, 35 मोबाइल संच, 26 हजार 960 रुपयांची रोकड आणि तीन किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
अज्जू अहमद शेख (रा. कोंढवा) आणि गणेश सिद्धू पाटोळे (रा. बुद्धविहार सोसायटी, कोंढवा) असे अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.
गणेश पाटोळे हा अज्जू शेख याच्याकडे केवळ 500 रुपये पगारावर कामाला आहे.
या दोघांवर यापूर्वी एनडीपीएसचे दोन गुन्हे दाखल आहेत. त्यात 200 ग्रॅम गांजा बाळगल्याच्या कारणावरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.

काकडे वस्तीतील शिवनेरी गल्लीतील दर्ग्याजवळ सापळा रचला
अंमलीपदार्थ विरोधी कृती दलाला कोंढव्यात अंमली पदार्थांची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी काकडे वस्तीतील शिवनेरी गल्लीतील दर्ग्याजवळ सापळा रचला.
तेथे अज्जू आणि गणेश पाटोळे आले होते. त्यांच्याकडे तीन किलो गांजा आढळला.
पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. वेशांतर केलेले पोलीस या दोघांबरोबर तेथे उपस्थित होते. 500 रुपये, 1 हजार रुपयांचा गांजा विकत घेण्यासाठी ते तेथे पहाटेपासून येत होते. त्यांनी गांजाची मागणी केल्यानंतर पोलीस त्याला बाजूला घेऊन ताब्यात घेत होते.
अशा प्रकारे तब्बल 43 जण गांजा विकत घेण्यासाठी तेथे आले होते़.

अंमली पदार्थ कृती दल महाराष्ट्रच्या पुणे पथकाचे प्रमुख ज्योतिप्रिया सिंह, पोलीस उपमहानिरीक्षक प्रवीण पाटील, पोलीस उपायुक्त प्रवीण पाटील, पोलीस उपअधीक्षक नंदिनी वग्यानी, तावसकर, पोलीस उपनिरीक्षक आशिष सरवदे, सहायक फौजदार तुपे, पोलीस हवालदार कळसकर, पोलीस अंमलदार ढेभे, साबळे, होळकर यांनी ही कारवाई केली.









