Pune Crime News | पुण्यात आयटी इंजिनिअरने केली गर्भवती पत्नीची हत्या; स्वतःही गॅलरीतून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न


एका उच्चशिक्षित सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीने कौटुंबिक वादातून आपल्या ३ महिन्यांच्या गर्भवती पत्नीचा गळा चिरून निर्घृण खून केला.

गर्भवती पत्नीचा गळा चिरून पतीचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न

पुणे: पिंपरी-चिंचवड अंतर्गत येणाऱ्या देहूगाव (देहूरोड) परिसरात एक अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे.

एका उच्चशिक्षित सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीने कौटुंबिक वादातून आपल्या ३ महिन्यांच्या गर्भवती पत्नीचा गळा चिरून निर्घृण खून केला.

या थरारक घटनेनंतर पतीने स्वतःवर ब्लेडने वार करत दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून खाली उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

घरगुती वादाचे पर्यवसान हत्येत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभांगी आकाश बारसकर (वय २८) असे मृत विवाहितेचे नाव आहे. तर तिचा पती आकाश रामदास बारसकर (वय ३१) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आकाश हा पुण्याच्या हिंजवडी आयटी हबमधील एका नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत डेव्हलपर म्हणून काम करतो. त्यांचा विवाह डिसेंबर २०२३ मध्ये झाला होता.

गेल्या ४-५ महिन्यांपासून ते देहूगाव येथील ‘ओंकार सोसायटीत’ भाड्याच्या घरात राहत होते.

शेतजमीन खरेदीवरून झाला होता वाद

मिळालेल्या माहितीनुसार, आकाशला त्याच्या मूळ गावी (अहिल्यानगर जिल्हा) शेतजमीन खरेदी करायची होती. मात्र, पत्नी शुभांगीचा या जमीन खरेदीला विरोध होता.

याच कारणावरून रविवारी पहाटे ४ ते ५ च्या सुमारास त्यांच्यात जोरदार भांडण झाले.

हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात आकाशने धारदार ब्लेडने शुभांगीचा गळा चिरून तिची हत्या केली.

बनाव रचण्याचा प्रयत्न अन् गॅलरीतून उडी

हत्या केल्यानंतर आकाशने सुरुवातीला घरात चोरी किंवा दरोडा पडल्याचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला.

मात्र, नंतर भीतीपोटी त्याने स्वतःच्या अंगावर ब्लेडने वार केले आणि घराच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली रस्तावर उडी घेतली.

सोसायटीच्या आवारात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आकाशला पाहून नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.

पोलिस तपास सुरू

देहूरोड पोलिस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले असता त्यांनी घरात शुभांगीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहिला.

पोलिसांनी आरोपी पती आकाश बारसकर विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०३ (१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी सध्या गंभीर जखमी असून, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच त्याला अटक करण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!