लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन अल्पवयीन मुलांनी मिळून एका २१ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
अल्पवयीन मुलांनी केली तरुणाची निर्घृण हत्या
पुणे : पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन अल्पवयीन मुलांनी मिळून एका २१ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
धारदार शस्त्राने सपासप वार करून तरुणाला जागीच संपवण्यात आले असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
विकासकुमार अनुपकुमार श्रीवास्तव (वय २१, रा. कोरेगाव भीमा, ता. शिरूर, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे.
नेमकी घटना काय?
विकासकुमार आणि या अल्पवयीन मुलांमध्ये चार ते पाच दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. या भांडणाचा राग मुलांच्या मनात होता आणि त्यातूनच त्यांनी बदला घेण्याचे ठरवले.
याच वादाच्या रागातून मुलांनी विकासकुमारला गाठले व त्याला शिवीगाळ केली. एवढ्यावर न थांबता त्यांनी विकासकुमारवर धारदार शस्त्राने सपासप वार केले.
हा हल्ला इतका भयंकर होता की त्यात विकासकुमारचा जागीच मृत्यू झाला. यानंतर हल्लेखोर तिथून पसार झाले.
याप्रकरणी मृत तरुणाचा भाऊ आकाशकुमार श्रीवास्तव (वय २३) याने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यावरून पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. किरकोळ वादातून मुलांनी टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.









