झोपाळ्याच्या दोरीचा फास लागून नशिराबाद येथे दीड वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
झोपाळ्याच्या दोरीचा बसला फास
जळगाव : घरात खेळत असताना झोपाळ्याच्या दोरीचा गळ्याभोवती फास लागल्याने अवघ्या दीड वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नशिराबाद येथे घडली.
राजर्षी छत्रपती शिवाजीनगर, नवीन प्लॉट परिसरात ही दुर्घटना घडली. सार्थक योगेश बन्हाटे असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.
या घटनेमुळे बन्हाटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, नशिराबाद परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
खेळता खेळता घडली दुर्घटना
मिळालेल्या माहितीनुसार, सार्थक घरातील झोपाळ्यावर खेळत होता. खेळत असताना अचानक झोपाळ्याच्या दोरीचा त्याच्या गळ्याभोवती फास लागला.
या घटनेची त्यावेळी कुटुंबीयांना कल्पना आली नाही. सार्थकची आई घराबाहेर कपडे धुण्याचे काम करत होती. काही वेळाने काम आटोपून ती घरात आली असता, सार्थक झोपाळ्याच्या दोरीत अडकलेल्या अवस्थेत दिसला.
हे दृश्य पाहताच आईने आरडाओरड करत कुटुंबातील इतर सदस्यांना मदतीसाठी बोलावले.
रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू
कुटुंबीयांनी तातडीने सार्थकला दोरीतून सोडवून उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. उपचार मिळण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली.
अवघ्या दीड वर्षांच्या सार्थकचा अशा प्रकारे अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सार्थकला चार वर्षांची मोठी बहीण असून, तो घरातील सर्वांचा लाडका होता.
चिमुकल्याच्या अचानक जाण्याने आई-वडील आणि मोठ्या बहिणीवर दुःखाचा मोठा आघात झाला आहे.
या घटनेची माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी बन्हाटे कुटुंबीयांच्या घरी धाव घेतली.
ऐन खेळण्या-बागडण्याच्या वयात चिमुकल्याचा झालेला हा दुर्दैवी अंत नशिराबादकरांच्या मनाला चटका लावून गेला असून परिसरात शोककळा पसरली आहे.









