तालुक्यातील टाकरखेडा येथे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना 27 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास घडली.
एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना
अमळनेर : तालुक्यातील टाकरखेडा येथे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना 27 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास घडली.
कामानिमित्त टाकरखेडा येथे वास्तव्यास असलेल्या पती-पत्नीने आपल्या दोन चिमुकल्या मुलांसह रेल्वेखाली झोकून देत जीवन संपवल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या घटनेमुळे टाकरखेडा तसेच रणाईचे परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पती-पत्नी आणि दोन लहान मुलांचा समावेश
मिळालेल्या माहितीनुसार, सुनील अमृत भिल (वय २६) आणि त्यांची पत्नी पार्वती सुनील भिल (वय २३) हे मूळचे रणाईचे येथील रहिवासी होते.
कामानिमित्त हे दाम्पत्य टाकरखेडा येथे राहत होते. त्यांना सनी (वय ६) आणि राज (वय ३) अशी दोन मुले होती. सनी हा सहा वर्षांचा, तर राज अंगणवाडीत जाणारा चिमुकला होता.
२७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास चौघेही घरातून बाहेर पडल्याचे समजते.
त्यानंतर टाकरखेडा परिसरातील रेल्वेमार्गावर चौघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. पहाटे सुमारे ४.४० वाजता रेल्वे प्रशासनाकडून पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली
माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय गणेश अहिरे, हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील, विजय भोई, योगेश बागुल आणि राहुल पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
पोलिसांकडून पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक किंवा अन्य कोणत्या कारणातून हे टोकाचे पाऊल उचलण्यात आले, याचा तपास पोलीस करीत आहेत.
तपास पूर्ण झाल्यानंतरच घटनेमागील कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने टाकरखेडा आणि रणाईचे परिसरावर दुःखाचे सावट पसरले आहे.
दोन चिमुकल्या मुलांसह आई-वडिलांचा मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिकांनाही मोठा धक्का बसला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.









